महिलेची हत्या करून दरोडा टाकणाऱ्या तिघांना उत्तर प्रदेशमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 AM2021-07-27T04:42:27+5:302021-07-27T04:42:27+5:30
मीरारोड : भाईंदर पश्चिमेस घरात एकट्या असलेल्या महिलेची हत्या करून तिचे दागिने आदी ३६ हजारांचा ऐवज लुटून पसार झालेल्या ...
मीरारोड : भाईंदर पश्चिमेस घरात एकट्या असलेल्या महिलेची हत्या करून तिचे दागिने आदी ३६ हजारांचा ऐवज लुटून पसार झालेल्या तिघा आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे.
भाईंदर स्मशानभूमीजवळील गांधी नगरमध्ये राहणारे लाला शर्मा हे पत्नीचा भाचा गोविंदसह २१ जुलै रोजी कामावरून घरी परतले असता पत्नी सुमनदेवी (२७) हिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे त्यांना आढळले. तिच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, नाकातील नथ, कानातल्या कुड्या तसेच घरातील इस्त्री, तीन मोबाइल, एटीएम कार्ड आदी ३६ हजारांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आले. २३ जुलै रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात खून करून दरोड्याचा गुन्हा अज्ञात इसमाच्याविरुद्ध दाखल करण्यात आला.
या हत्याकांडामुळे खळबळ माजली होती. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, गुन्हे शाखा युनिट-१चे निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक विलास कुटे व नीलेश शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक वेदपाठक, राजू तांबे, सह संदीप शिंदे, किशोर वाडीले, अर्जुन जाधव, संजय शिंदे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, विकास राजपूत, सतीश जगताप व महेश वेळे यांच्या पथकाने गुन्ह्याचा युद्धपातळीवर तपास सुरू केला.
लाला यांनी रबर कंपनीत कामास ठेवलेला व त्यांच्या घरीच राहणारा सोनू विजय चौहान (३०) हा बेपत्ता असल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. कसब व तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातून, सोनूसह सुधीरकुमार तुलसी चौहान (१९) व मुन्नी कुलदीप चौहान (३२) या तिघांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता लालाकडे भरपूर दागिने सापडतील, म्हणून तिघांनी संगनमत करून सुमनदेवीची हत्या केली. परंतु त्यांना नाममात्र दागिने व ऐवज हाती लागला. हत्या केल्यावर तिघे बलिया येथे पळून गेले. सोनूची आत्या असलेली मुन्नी ही मुंबई फिरायला आली होती, तर सुधीर हा सोनूचा मित्र आहे.