खंडणी उकळणाऱ्या तिघांना उल्हासनगरमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:07 PM2019-08-28T22:07:38+5:302019-08-28T22:15:15+5:30

पत्रकार असल्याची बतावणी करीत एका हॉटेल चालकाकडून १५ हजारांची खंडणी उकळणा-या तिघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्या आणखी चार साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Three arrested for ransom from Ulhasnagar | खंडणी उकळणाऱ्या तिघांना उल्हासनगरमधून अटक

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई २५ हजारांची मागणी करुन १५ हजार उकळलेमध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : महादान संस्थेचा पदाधिकारी तसेच पत्रकार असल्याची बतावणी करून १५ हजारांची खंडणी उकळणा-या तरुण असरानी (३३, रा. उल्हासनगर), जावेदअली सय्यद (४४, रा. उल्हासनगर) आणि सुरजित सरकार (४३, रा. उल्हासनगर) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्यांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
उल्हासनगर येथील लॉजिंग-बोर्डिंगचे व्यावसायिक रवी शेट्टी (३३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ आॅगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ‘महादान कल्याण’ संस्थेचा पदाधिकारी असल्याचे सांगून हॉटेलमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे या तिघांनी फोनवरून त्यांना धमकावले. त्यानंतर, त्यांनी पत्रकार असल्याचीही बतावणी केली. त्यामुळे पोलिसांमध्ये चांगली ओळख असल्याचे सांगून लॉजिंग-बोर्डिंगबाबत खोटी तक्रार करून कारवाई करण्याचीही त्यांनी धमकी दिली. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे २५ हजारांची मागणी केली. त्यानंतर, उल्हासनगर येथील संभाजी चौकातील संतू बिल्डिंगजवळ असलेल्या महादान कल्याण संस्थेच्या कार्यालयात त्यांना बोलवून सुरज मनवानी, उपाध्यक्ष अजित जगताप आणि त्यांच्या दोन ते तीन साथीदारांनी त्यांना ‘उल्हासनगर में धंदा करना हैं तो, सुरज सेठ ने बोला हुआ पैसा देना पडेगा, नही तो तुम्हारा कुछ खैर नहीं’ असे धमकावून २५ हजारांपैकी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर, २३ आॅगस्ट रोजी हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे सुरज मनवानी याने पाठवलेल्या व्यक्तीने पाच हजार रुपये घेतले. तर उर्वरित १५ हजारांपैकी पाच हजार रुपये २७ आॅगस्ट रोजी स्वीकारताना वरील तिघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. ही रक्कम दिली नाही तर गुंडांकडून मारहाण करण्याची त्यांनी धमकी दिली होती. हीच तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने या तिघांनाही रंगेहाथ अटक केली.

Web Title: Three arrested for ransom from Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.