भिवंडीतील रंगायतनची खिडकी पडल्याने तीन कलाकार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:43 AM2018-01-16T00:43:05+5:302018-01-16T00:59:48+5:30
रंगायतनच्या स्ट्रक्चरल आॅडीटची मागणी
भिवंडी : शहरातील एकमेव सांस्कृतीक केंद्र म्हणून प्रसिध्द असलेल्या स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनच्या इमारतीची खिडकी खाली पडल्याने तीन कलाकार जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.मात्र या घटनेची तक्रार संबधितांनी न केल्याने पालिकेच्या अधिकाºयांनी देखील ही घटना गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे शहरातील संतप्त नाट्यरसिकांकडून या रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शहरातील स्वामी विवेकानंद शाळेचे शनिवारी सायंकाळी वार्षिक स्नेह संमेलन होते. या संमेलनात येणाºया मान्यवरांच्या स्वागतासाठी कल्याणचे बॅण्ड पथक तेथे उभे केले होते.त्याचवेळी नाट्यगृहाच्या दुसºया मजल्यावरील मोडकळीस आलेली खिडकी अचानकपणे लोखंडी ग्रिलसहीत खाली बॅण्ड पथकातील तीन कलाकारांच्या अंगावर पडली. त्यामुळे बॅण्ड पथकातील विलास चौव्हान(२४), वृश्चिक धुमाळ (२४) व हर्ष (२९)हे तीघेजण जखमी झाले.त्यांना पाठीवर मुका मार लागला असुन खिडकीच्या तुटलेल्या काचा त्यांच्या शरिरात घुसल्या.त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला टाके घालावे लागल्याची माहिती आॅर्बीट हॉस्पिटलचे डॉ. जयेश शेळके यांनी दिली. त्यांना ताबडतोब उपचार करून घरी पाठवून दिल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.
शहरातील नागरिकांना मराठी नाटके व इतर मनोरंजनाचे कार्यक्र म पाहण्यासाठी ठाणे, मुंबई येथील नाट्यगृहात जावे लागत असल्याने शहरातील नाट्यप्रेमींनी शहरात नाट्यगृह बांधावे,अशी मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिकेने सन १९८८ साली कोट्यावधी रूपये खर्च करून १३०० आसनांचे अद्यावत नाट्यगृह बांधले आहे.परंतू पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठाकरे रंगायतनची दुर्दशा झाली आहे.अशा स्थितीत शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक संमेलन आणि काही आंबट शौकीनांसाठी होत असलेल्या नृत्यांच्या कार्यक्रमावर हे रंगायतन तग धरून आहे. रंगायतनचे पावित्र्य राखण्यासाठी व त्यामधील सोयीसवलती करण्याकडे शिवसैनिकांनी गेली २५ वर्षे धृतराष्ट्राची भूमीका घेतल्याने रंगायतनच्या इमारतीची देखील दैना झाली आहे.आंतील रंगमंच ढासळलेल्या स्थितीत आहे. मंचावरील पडदे(कल्टन)फाटलेले आहेत.खुर्च्या मोडलेल्या आहेत.ठेकेदाराने लाखो रूपये घेऊन पुरविलेला माईक-स्पिकर वर्षभरांत निकाली निघाला आहे.तर नाट्यगृहाच्या खिडक्या व तावदाने तुटलेल्या अवस्थेत आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी नाट्यगृहासाठी ३५ लाख रूपये बांधकाम विभागाकडून तर २० लाख रूपयांची तरतुद विद्युत विभागाकडून केली जाते. मात्र हा खर्च कागदावर केला जातो,असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या नाट्यगृहाची अवस्था भकास व भयाण झाली आहे. त्यामुळे शहर व परिसरांतील नाट्यरसिकांमध्ये नाराजी पसरली असुन पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन नाट्यरसिकांसाठी स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करून ते दुरूस्त करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.