रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे तीन दुचाकी घसरल्या, चौघे जखमी, मानपाडा ब्रिजवरील घटना
By जितेंद्र कालेकर | Published: February 24, 2024 07:49 PM2024-02-24T19:49:11+5:302024-02-24T19:49:29+5:30
सांडलेल्या ऑइलवर माती पसरवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठाणे: रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवरुन घसरल्याने तीन दुचाकींवरील सागर म्हापदी (३२) सह चौघेजण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९.२६ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील मानपाडा ब्रिजवर घडली. सांडलेल्या ऑइलवर माती पसरवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
शनिवारी सकाळी मानपाडा ब्रिजवर एका वाहनामधून ऑइलची गळती झाली होती. याच दरम्यान तिथून जाणाऱ्या तीन दुचाकी ऑइलवरुन घसरल्या. या घटनांमध्ये सागर म्हापदी, अब्रार सय्यद (२५),रोहित पाटील (३४) आणि सलमान शेख (२४) हे चौघे जखमी झाले. सागर यांच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत तर सय्यद याच्या पायाला मुका मार लागला आहे. याशिवाय, रोहित याच्या कमरेला किरकोळ तर सलमान याच्या डाव्या पायाला व कमरेला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी मानपाडा येथील खाजगी हॉस्पिटल येथे दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तर घटनास्थळी रोडवर सांडलेल्या ऑइलवर तातडीने माती पसरविण्यात आली. त्यानंतर हा रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला. त्या तिन्ही दुचाकींचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.