आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील तिघा सट्टेबाजांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: April 26, 2024 08:48 PM2024-04-26T20:48:06+5:302024-04-26T20:48:45+5:30
ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: १२ मोबाईल फोनसह एक टॅब आणि एक लॅपटॉप हस्तगत
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आरसीबी आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यामधील टी ट्वेट्टी आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगड मधील शानू ललित बेरीवाल (३०), रजत बाबूला शर्मा, (३०) आणि विजय सिताराम देवगन (४०) या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने भिवंडी, कोनगाव येथील एका लॉजमधून अटक केली. त्यांच्याकडून १२ मोबाईल फोन, एक टॅब आणि एक लॅपटाॅप असा एक लाख ९७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पाेलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विराेधी पथकातील पाेलिस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकाने सापळा रचून २५ एप्रिल २०२४ रोजी भिवंडी, कोनगाव येथील हॉटेल के.एन.पार्क, येथे छत्तीसगड येथील त्रिकुटाला आएपीएल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडले. त्यांनी आपसात संगनमत करून लॅपटॉप मध्ये 'सुभलाभ' नावाचे सॉफ्टवेअर मध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्यांकडून घेतलेल्या सट्टयाची माहिती भरून रियलमी पॅड टॅब मध्ये 'ताज ७७७ स्पोर्ट' अॅप्लीकेशन वर आरसीबी व सनरायजर्स हैद्राबाद यांच्यामधील टी २० मॅच लाईव्ह बघून, सट्टा लावणाऱ्या इतरांकडून ११ लाख ८६ हजार ८११ रुपयांचा सट्टा स्विकारला.
तसेच रेड मी ९ कंपनीच्या मोबाईल मध्ये 'सुपर असिस्टंट' अॅप्लीकेशन मध्ये फरार सट्टेबाज जानू यांची १९ क्रमांकाची बुकीची बेटींग लाईन घेवून तिच्यावर सात लाख तीन हजार रुपयांचा सट्टा लावला. तसेच सट्टा खेळण्यासाठी शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेवून शासनाची आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिन्ही आराेपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख ९७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ते छत्तीसगड येथून आयपीएल मॅचवर सट्टा लावत असल्याचे समोर आले आहे.