ठाणे जिल्ह्यात तीन लाचखोर अधिकारी अटकेत; टिटवाळ्यात एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 05:08 AM2020-03-13T05:08:22+5:302020-03-13T05:08:32+5:30
मुंब्य्रात कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश
ठाणे : मुंब्य्रात पाणीपुरवठा विभागाचा कनिष्ठ अभियंता संजय वाघुलेला ८० हजारांची लाच स्वीकारताना, तर टिटवाळा येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना हेमंत भगतला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.
मुंब्रा येथील मजूर ठेकेदाराचे बिल मंजूर झाले होते. त्याचा मोबदला म्हणून ठाणे पालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीमधील पाणीपुरवठा विभागाचा कनिष्ठ अभियंता वाघुलेने ठेकेदाराकडे एक लाख २५ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती ८० हजार देण्याचे ठरले. यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची ११ मार्चला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानंतर १२ मार्चला वाघुलेला अटक केली. त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीसांत गुन्हा दाखल केला.
तर, ठाण्यातील वर्तकनगर भागातील रहिवाशाने चाळींचे अनधिकृत बांधकाम केले. त्यावर पालिकेमार्फत कारवाई न करण्यासाठी कल्याण तालुका पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक नारायण गाडेने या रहिवाशाकडे ५० हजारांची लाच मागितली. याच अनुषंगाने लावलेल्या सापळ्यामध्ये ११ मार्च रोजी हेमंत भगतला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली. तर, गाडेचा शोध ुसुरू आहे. दोघांविरुद्ध कल्याण तालुका पोलीसांत गुन्हा दाखल आहे.
पडताळणीनंतर अटक
जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी कोकण विभागाच्या स्नेहल गोवेकर या वरिष्ठ संशोधन अधिकारी महिलेने आणि कामाठी अमित मोरे या दोघांनी ९० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध १२ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी १५ जानेवारी रोजी पडताळणी झाली. त्यानंतर, हा गुन्हा दाखल असून चौकशी सुरू असल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.