नव्या इमारतीसाठी जि.प.च्या तीन इमारती जमीनदाेस्त
By सुरेश लोखंडे | Published: May 4, 2024 05:52 PM2024-05-04T17:52:10+5:302024-05-04T17:53:12+5:30
ठाणे शहराचा प्रमुख, महत्वाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुख्य बाजारपेठेत जिल्हा परिषदेची इमारत आकार घेत आहे.
ठाणे : येथील तहसीलदार कार्यालयाजवळील ठाणे जिल्हा परिषदेची धाेकादायक जुनी, जीर्ण इमारत काही वर्षांपूर्वीच पाडण्यात आली आहे. मात्र उर्वरित तीन इमारती उभ्या हाेत्या. त्या अलिकडेच जमीनदाेस्त करून त्या जागी आता भव्य इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुख्य बाजारपेठेत ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हाेते. पण इमारत धाेकादायक झाल्यामुळे ते पाडययात आली आणि त्यातील विविध विभाग अन्यत्र हलवण्यात आले हाेते. मात्र उर्वरित पदाधिकाऱ्यांचे निवासस्थान, प्रशासकीय इमारत आणि शिक्षण विभागाची फार जूनी इमारत आता कंत्राटदाराने पाडून माेठ्या भव्य इमारतीच्या कामाला प्रारंभ केला आहे. त्यासाठी आता या कार्यालयाची जागा माेकळे मैदान झाले असून त्यावर इमारतीचा काॅलम लवकरच उभा करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.
ठाणे शहराचा प्रमुख, महत्वाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुख्य बाजारपेठेत जिल्हा परिषदेची इमारत आकार घेत आहे. या बांधकामासाठी येथील जिल्हा परिषदेचे कार्यालय आता वागळे इस्टेट येथील जीएसटी विभागाच्या इमारतीसमाेर हलवण्यात आले आहे. जुने कार्यालय ठाणे रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ असल्यामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील कर्मचारी जिल्हा परिषदेत सहज येत हाेता. पण आता हे कार्यालय वागळे इस्टेट एमआयडीसी परिसरात हलवण्यात आल्यामुळे त्यांना येजा करण्याच्या समस्येला ताेंड द्यावे लागत आहे.