झोपेतच स्लॅबचे प्लॅस्टर कोसळल्याने तीन मुले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:39+5:302021-07-15T04:27:39+5:30
शांतीनगर पोलीस स्टेशनअंतर्गत फंडोलेनगर परिसरात सात वर्षांपूर्वी चार मजली घर नंबर १३०, नागाव याठिकाणी ही इमारत बनविण्यात आली. या ...
शांतीनगर पोलीस स्टेशनअंतर्गत फंडोलेनगर परिसरात सात वर्षांपूर्वी चार मजली घर नंबर १३०, नागाव याठिकाणी ही इमारत बनविण्यात आली. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे कुटुंबीय जेवण करून घरात झोपले असताना रात्री अचानक इमारतीच्या स्लॅबचे प्लॅस्टर झोपलेल्या मुलांच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत तीन मुलं जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ जखमी मुलांना उपचाराकरिता नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मुलांच्या डोक्याला तसेच हातापायाला जबर मार लागला आहे.
भिवंडीत फक्त सात वर्षांपूर्वी बनवण्यात आलेली ही इमारत अनधिकृत असून, अवघ्या काही वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या इमारतीचा स्लॅबचा भाग कोसळत असल्याने इमारतीचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. शहरात धोकादायक इमारत दुर्घटनेच्या घटना नेहमी घडत असून, त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षात चौकशी केली असता तेथील दूरध्वनी मागील तीन दिवसांपासून बंद असल्याने या दुर्घटनेची या कार्यालयाला माहितीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.