गुडविनकडून १६५ तक्रारदारांची तीन कोटी आठ लाखांची फसवणूक; नौपाडा पोलीसांत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:53 AM2019-10-31T01:53:42+5:302019-10-31T01:54:17+5:30
मीरा रोड, वाशी, वसईतही होणार गुन्हे दाखल
जितेंद्र कालेकर
ठाणे: नौपाडा पोलीस ठाण्यात गुडविन ज्वेलर्सच्या विरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवार आणि बुधवारी दिवसभरात ९२ गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत. आतापर्यंत १६५ तक्रारदारांची तीन कोटी आठ लाखांची फसवणूक झाली आहे. यातील एकाने तर पत्नीच्या नावाने पाच लाखांची आणि स्वत:च्या नावाने दहा लाखांची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘गुडविन ज्वेलर्स’ गुंतवणुकदारांच्या फसवणूकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून नौपाडा पोलीस ठाण्यात २८ आॅक्टोबर रोजी पूजा शेलार आणि त्यांच्या आई निलीमा यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ ६८ तक्रारी दाखल झाल्या. ७० तक्रारदारांची एक कोटी ५३ लाख ६७ हजारांची फसवणूक झाली. त्यानंतर २९ आणि ३० आॅक्टोबर या दोनच दिवसांमध्ये तक्रारदारांची संख्या १६५ झाली असून त्यांची तीन कोटी आठ लाखांची फसवणूक झाली आहे. यामध्ये अब्राहिम यांची एकट्याचीच १५ लाखांची फसवणूक झालेली आहे. त्यांनी स्वत:च्या नावाने दहा लाखांची तर पत्नीच्या नावाने पाच लाखांची गुंतवणूक केली होती. याशिवाय, मंगेश मोकल यांची १३ लाख ५२ हजार, सुशांत थॉमस यांची १२ लाखांची, नरेंद्र आंबटकर यांची १२ लाख ६५ हजारांची फसवणूक आहे. हा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता आहे. गुडविनच्या मीरा रोड, वाशी, वसईतही शाखा होत्या. तिथेही अशाच प्रकारच्या तक्रारी असून त्याही संबंधित पोलीस ठाण्यात अथवा नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल होतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला असला तरी ठाण्यातील गुडविनबाबतची प्रत्येक तक्रारदाराची फिर्याद नौपाडा पोलीस ठाण्यात घेतली जाणार आहे. त्यासाठी एक विशेष अर्जाचा नमुनाही तयार करण्यात आला आहे. हीच फिर्याद आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केली जात आहे. - अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे