विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये तीन कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:14+5:302021-06-09T04:50:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : मास्क परिधान न करणारे आणि विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांवर केडीएमसी आणि पोलिसांतर्फे संयुक्त कारवाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मास्क परिधान न करणारे आणि विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांवर केडीएमसी आणि पोलिसांतर्फे संयुक्त कारवाई सुरू आहे. गेल्या सात दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या ५३३ नागरिकांवर कारवाई करून, त्यांच्याकडून एकूण दोन लाख ६६ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला, तर विनाकारण फिरणाऱ्या एक हजार २०९ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यात तीन जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.
केडीएमसी हद्दीत कोरोनाचे रुग्ण सध्या कमी होत आहेत. मात्र, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांमध्ये सोमवारपासून काहीशी शिथिलता आणण्यात आली आहे. नागरिकांनी शक्यतो कामाशिवाय बाहेर फिरू नये, बाहेर सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना न चुकता मास्क परिधान करावा आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसीतर्फे वारंवार केले जात आहे, परंतु नागरिकांकडून हलगर्जी सुरू असल्याचे मनपा आणि पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे.
-------------------
कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू
कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवारी कोरोनाचे नवीन १०२ रुग्ण आढळून आले, तर रुग्णालयातील १७१ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दुसरीकडे १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने, सध्या एक हजार ५९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजमितीला केडीएमसीच्या हद्दीत एक लाख ३४ हजार १७७ रुग्ण आढळून आले आहेत. दोन हजार १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख ३० हजार ४०६ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
--------------------