तीन कोटी रुपयांची वीजचोरी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:55 AM2020-01-05T00:55:59+5:302020-01-05T00:56:03+5:30
‘महावितरण’च्या कल्याण परिमंडळात वीजचोरांविरुद्ध सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
डोंबिवली : ‘महावितरण’च्या कल्याण परिमंडळात वीजचोरांविरुद्ध सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत ९८३ वीजचोरांवर कारवाई करून जवळपास ५० लाख युनिटची वीजचोरी पकडल्याची माहिती कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी शनिवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
कल्याण परिमंडळ कार्यालयाने डोंबिवली, कल्याण, बदलापूर, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, वसई-विरार, नालासोपारा, वाडा, आचोळे, बोईसर, डहाणू, पालघर, जव्हार, मोखाडा, सफाळे, तलासरी, विक्रमगड या भागांत महिनाभरापासून वीजचोरांविरुद्ध मोहीम उघडली होती.
या मोहिमेत बुधवारी १५७, गुरुवारी ३८८ तर शुक्रवारी ४३८ जणांकडे सुरू असलेली ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. त्यातील ८७४ वीजचोरांविरुद्ध वीज कायद्यांतर्गत, १०९ जणांविरुद्ध अन्य कलमांन्वये कारवाई करण्यात आली. मीटरशी छेडछाड किंवा मीटर बायपास करणे तसेच वीजतारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी असे प्रकार आढळून आले आहेत.
अचूक बिल मिळावे, यासाठी मीटर बदलण्याची कार्यवाही सुरू आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत ४५०० सिंगल फेज मीटर बदलण्यात आले आहेत. तर, आणखी ४५ हजार मीटर बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच एप्रिलपासून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांपैकी १०१७ ग्राहक विजेचा चोरटा वापर करीत असल्याचे आढळले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. विजेचा अनधिकृत
वापर टाळावा, असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे. अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, सुनील काकडे, अशोक होलमुखे (प्रभारी), किरण नगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे.
> एप्रिल ते डिसेंबर, २०१९ या नऊ महिन्यांच्या कालावधीत कल्याण परिमंडळात वीजचोरांविरुद्ध ४७ कोटी ६१ लाख रुपयांची दंडात्मक वीजआकारणीची कारवाई करण्यात आली. दंडात्मक वीजआकारणी न भरणाऱ्या २१० जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. २९८ वीजचोरांकडून एक कोटी ४१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.