विनापरवानगी रस्ता दुरुस्तीवर तीन कोटी खर्च; दोषींवर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 12:20 AM2019-11-01T00:20:44+5:302019-11-01T00:21:02+5:30
महापालिकेच्या या चुकीच्या कामामुळे यंदा पावसाच्या पाण्याचा फटका येथील कामगार हॉस्पीटलसह आजूबाजूच्या भागांना बसला आहे.
ठाणे : एकीकडे खाजगी रस्त्याच्या दुरुस्तीच्या मुद्यावरून पालिकेचा संबधीत विभाग अडचणीत आला असतांना आता आणखी एका रस्त्याच्या कामात पालिकेकडून दिशाभूल केली असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे मूळ निविदेत रस्ता उंच करण्याबरोबरच गटार नव्याने उभारण्याचे प्रस्तावित नसतांनाही केवळ त्याकामासाठी तब्बल तीन कोटींचा वाढीव खर्च केल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या या चुकीच्या कामामुळे यंदा पावसाच्या पाण्याचा फटका येथील कामगार हॉस्पीटलसह आजूबाजूच्या भागांना बसला आहे.
या संदर्भात भाजपचे रायलादेवी विभागाचे सरचिटणीस प्रशांत लंके यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा पालिकेला पत्राद्वारे दिला आहे. रायलादेवी व लोकमान्यनगर प्रभाग समिती अंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, रस्ता क्रमांक ३३ हा मूळ डांबरी रस्ता ६ इंच ते तीन फुट उंच केला आहे. तो उंच करण्याचे अथवा रस्त्यालगत असलेले गटार नवीन करण्याचे मूळ प्रस्तावात नमूद केले नव्हते. परंतु, हा रस्ता उंच केल्याने येथील औद्योगिक गाळ्यात पावसाचे पाणी शिरले होते. तसेच आंबेवाडी भागासह राजीव गांधीनगर झोपडपट्टीतही पाणी शिरले होते.
२६ कोटींचा खर्च नेला २९ कोटींवर
माहिती अधिकाराअंतर्गत या रस्त्याची माहिती मागितली असता मूळ अंदाज खर्च हा २६ कोटींच्या आसपास होता. मात्र, नसलेल्या कामाचा यात समावेश करुन तो खर्च २९ कोटींच्या घरात नेल्याचा आरोपही यावेळी लंके यांनी केला आहे. परंतु, यासाठी कोणत्याही प्रकारची मंजुरी घेतली नसून सल्लागाराचीही मदत घेतली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर १५ दिवसात कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.