साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह व्यास क्रिएशन्सचा तीन दिवसांचा पुस्तक आदान प्रदान महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 03:56 PM2018-05-23T15:56:04+5:302018-05-23T16:09:52+5:30
व्यास क्रिएशन्सचा तीन दिवसांचा पुस्तक आदान प्रदान महोत्सव ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे.
ठाणे : वाचन हा उत्तम संस्कार असून त्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी सलग दुसर्या वर्षी व्यास क्रिएशन्सने‘पुस्तक आदान प्रदान’ महोत्सवाचे सहयोग मंदिर, पहिला मजला, ठाणे येथे 26 मे ते 28 मे या कालावधीत आयोजन केले आहे. ‘आपण वाचलेले आणि संग्रही पुस्तक दान करा आणि तुम्हाला आवडेल ते पुस्तक घेऊन जा’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात पुस्तक आदान प्रदानाखेरीज भरगच्च साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
शनिवार दि. 26 मे रोजी सायंकाळी 5 वाजता जिज्ञासा ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांंच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. सायंकाळी 6 वाजता व्यास क्रिएशन्स् प्रकाशित आणि दीपा जोशी लिखित ‘हस्तमुद्रा : तुमचं आरोग्य तुमच्या हातात’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांच्या हस्ते होईल. रविवार दि. 27 मे, सकाळी 10 ते 1 या वेळेत अभिवाचन, कविता वाचन, कथाकथन आणि नाट्यकथा याचे आयोजन केले आहे. यासाठी वय आणि भाषेचे बंधन नाही. नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी समन्वयक रामदास खरे - 9869014319 यांच्याशी संपर्क साधावा. संध्याकाळी 6 वाजता स्व. अरुण दाते यांच्या भावगीतांवर आधारित ‘शुक्रतारा’ हा संगीतमय कार्यक्रम कनिरा आर्ट सादर करतील. सोमवार दि. 28 मे रोजी सकाळी 10 वाजता ‘बालमैफील’ हा नाट्यछटा, कवितासादरीकरणाचा कार्यक्रम खास छोट्या दोस्तांसाठी आयोजित केला आहे. 5 ते 15 वयोगटातील बालकलाकार यात सहभागी होतील. नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी समन्वयक श्रीरंग खटावकर - 7039410869 यांच्याशी संपर्क साधावा. सायंकाळी 5.30 वाजता स्वा. सावरकर जयंतीनिमित्त स्वरसंवादिनी प्रस्तुत आणि पुष्पा लेले संचलित ‘गीत सावरकर’ हा वि. दा. सावरकर यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार असून ह.भ.प. बाबूराव कानडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी व्यास क्रिएशन्स् प्रकाशित आणि श्री. वा. नेर्लेकर लिखित धगधगते यज्ञकुंड ः वि. दा. सावरकर या पुस्तकाच्या मराठी 8व्या आणि 9 व्या, हिंदी दुसर्या आणि इंग्रजी दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल.हा संपूर्ण महोत्सव पूर्णतः विनामूल्य असून सर्व वयोगटातील रसिक या महोत्सवात सहभागी होऊ शकतात. पुस्तकांच्या आदान-प्रदानासाठी भाषेचे बंधन नाही. आदान-प्रदान महोत्सवात वाचकांनी दान केलेली आणि उरलेली पुस्तके ठाणे आणि आसपासच्या परिसरातील तब्ब्ल 20 वृद्धाश्रमांना भेटीस्वरूपात देण्यात येणार आहेत. साहित्यप्रेमींनी आपल्या संग्रही असलेली दुर्मीळ, नवी जुनी वाचनीय पुस्तके घेऊन या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश गायकवाड यांनी केले आहे.
ज्येष्ठांसाठी घरपोच सेवा
पुस्तक आदान प्रदान सोहळा सर्वांसाठी विनामूल्य आहे, मात्र इच्छा असूनही ज्येष्ठांना पुस्तके घेऊन येणे शक्य नसते. यासाठी यावर्षी आयोजकातर्फे खास ज्येष्ठांसाठी घरपोच सेवा देण्यात येणार आहे. यासाठी 022-25447038 या क्रमांकावर संपर्क साधावा.