ठाण्यात टपरीचालकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:31 PM2018-09-27T22:31:14+5:302018-09-27T22:35:34+5:30
गुटख्याची विक्री करणाऱ्या टपरी चालकाकडून दोन हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी कळवा (ठाणे) पोलिसांनी दीपक केशरी, निलेश फापाळे आणि सागर सोनवणे (२३) या तिघा कथित पत्रकारांना अटक केली आहे.
ठाणे : खारेगावातील दीपक पटेल या टपरीचालकाकडून दोन हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी दीपक केशरी (२७), निलेश फापाळे (३०) आणि सागर सोनवणे (२३) या तिघा कथित पत्रकारांना अटक केली आहे. त्यांना ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पटेल याच्याकडे २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास एकाने गुटख्याची मागणी केली. त्याने तो दिल्यानंतर तिथे आलेल्या या तिघांनी ‘हम प्रेसवाले है, एफडीए में आपकी शिकायत करेंगे’, असे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्याला एका वाहनात बसवून हा सौदा केला. प्रकरण दोन हजारांवर ‘सेटल’ करण्यात आले. पटेलने त्याच्या एका मित्राला बोलवून हे पैसे त्यांना देऊन आपली सुटका करून घेतली. तोपर्यंत तिथे कुठली कारवाई सुरू आहे, हे पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. त्यांच्यापैकीच एकाने कळवा पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक ईशाद सय्यद यांचे पथक गस्तीवर असताना त्यांनी गुटखा, खंडणीची दोन हजारांची रोकड आणि दोन लाखांच्या वाहनासह या तिघांना जेरबंद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. त्यांच्या आणखी तीन साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. हे तिघेही पत्रकार असल्याच्या नावाखाली खंडणी उकळत होते. पण, ते नेमके कोणत्या वृत्तपत्रात काम करतात, हे स्पष्ट झाले नसल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले. अशाच प्रकारे कोणाची लूटमार झाली असेल, तर त्यांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे. तसेच बंदी असलेला गुटखा बेकायदेशीरपणे विक्री करणाºया टपरीचालकांवरही कारवाई केली जाणार असल्याचे सय्यद यांनी स्पष्ट केले.