रेमडेसिविरच्या योग्य वापरावर नजर ठेवण्यासाठी तीन भरारी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:51+5:302021-04-30T04:50:51+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील खासगी कोविड रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हा नियंत्रण समितीच्या माध्यमातून उपलब्ध ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील खासगी कोविड रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हा नियंत्रण समितीच्या माध्यमातून उपलब्ध केले जात आहे. मात्र मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती खासगी रुग्णालयांत आहे. उपलब्ध करून दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन ज्या रुग्णासाठी मागविण्यात आले आहे, त्याच रुग्णाला मिळते आहे की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी तीन पथके नेमली आहेत. ही पथके रेमडेसिविरच्या वापरावर नजर ठेवणार आहेत.
तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सुषमा बांगर, संजय भालेराव आणि विठ्ठल दळवी या तीन जणांची तीन पथके या कामासाठी स्थापन करण्यात आली आहेत. या तिन्ही नायब तहसीदारांना महापालिका हद्दीतील ८५ खासगी कोविड रुग्णालयांपैकी प्रत्येकी ३५, २५ आणि २५ रुग्णालयांत रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर नजर ठेवायची आहे. खासगी रुग्णालयांकडून इंजेक्शनची मागणी मागविली जाते. ही माहिती महापालिकेच्या माध्यमातून जिल्हा नियंत्रण समितीला कळविली जाते. त्यानुसार इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यावर त्याचा वापर संबंधित रुग्णासाठीच होतो की नाही, हे पाहून रुग्णालयातील वापरलेल्या औषधाच्या बाटल्यांची तपासणी करायची आहे. त्या बाटल्यांवर रुग्णांचे नाव लिहिले होते की नाही याची पाहणी करायची आहे.
चौकट-१
तहसीदारांनी भरारी पथक नेमण्याचे आदेश २७ एप्रिल रोजी काढले आहेत. त्या दिवशी कल्याण-डोंबिवलीतील ८७ खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या २ हजार १५२ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता होती. एका रुग्णालयास किमान ५ ते जास्तीत जास्त २०० इंजेक्शन हवी असल्याचे नमूद करण्यात आले होते. रेमडेसिविर इंजेक्शन ३ हजार ४३५ हवी होती. जिल्हा नियंत्रण समितीकडे खासगी रुग्णालयांची मागणी नोंदविली जाते. एका रुग्णालयास १२ हवी असल्यास त्याला किमान ४ उपलब्ध करून दिली जातात. रेमडेसिविरचा तुटवडा असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे.
चौकट-२
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना केवळ २० टक्केच रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता गेल्या दोन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झालेली नाहीत. टोसिलीझूमॅब इंजेक्शन बाजारात उपलब्ध नाही. मात्र दोनच दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी ३० हजार इंजेक्शन मागविले असल्याची माहिती दिली होती.
---------------