ठाण्यातील तीन चौपाट्या डिसेंबरअखेर होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:55+5:302021-03-04T05:16:55+5:30
ठाणे : स्मार्ट सिटीअंतर्गत गंटागळ्या खाणाऱ्या ४२ प्रकल्पांपैकी काही प्रकल्प या वर्षअखेर पूर्ण होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने ...
ठाणे : स्मार्ट सिटीअंतर्गत गंटागळ्या खाणाऱ्या ४२ प्रकल्पांपैकी काही प्रकल्प या वर्षअखेर पूर्ण होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे. त्यानुसार यातील कोलशेत, नागला बंदर आणि साकेत येथील चौपाटींची कामे डिसेंबरअखेर मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले. यात कोलशेत - १ किमी, नागलाबंदर १.४० किमी, कावेसार- ३.७० किमी, साकेत- २५० मीटर अशी या चौपाटींची कामे असणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून स्मार्ट सिटीचे प्रकल्प गंटागळ्या खाताना दिसत होते. परंतु, आता कुठे काही प्रकल्प पूर्णत्वाकडे वळू लागले आहे. महापालिकेने खाडी किनारा विकसित करण्यासाठी (वॉटर फ्रंट डेव्हल्पमेन्ट) हा प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत खाडीचा विकास करताना येथे बोटिंग, जलक्रीडा, जलवाहतूक, खाडी किनाऱ्यावर मॅंग्रोज टेल्स, प्रॉमिनेड्स, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पब्लिक प्लेसेस, मिनी पिकनिक सेंटर आदी बाबींचा समावेश आहे.
यात ठाणे शहर, खारेगाव, साकेत, बाळकुम, कोलशेत, गायमुख, मोघरपाडा, कासारवडवली, कावेसार, रेती बंदर, पारिसक चौपाटी, मुंब्रा आणि दिवा आदी ठिकाणच्या खाडी किनाऱ्याचा या माध्यमातून विकास होणार आहे. चार ठिकाणच्या या कामांसाठी साधारणपणे २२४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी ठाणे पूर्व येथील खाडी किनारी येथे वॉटर फ्रन्टच्या कामाला सुरुवात झाली. परंतु, या कामाबाबतही आक्षेप घेण्यात आला होता. तर कोलशेत नागला बंदर, कावेसार-वाघबीळ येथे हा प्रकल्पासाठी महापालिकेने हरकती मागविल्या नाहीत, असे असतानाही ठेकेदाराला मात्र कामाची वर्कऑर्डर दिली. त्यामुळेदेखील वादंग निर्माण झाला होता. परंतु आता वादंगावर पडदा टाकून महापालिकेने या प्रकल्पांचे कामे मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू करून डिसेंबरअखेर यातील कोलशेत, नागला बंदर आणि साकेत चौपाटीचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा केला आहे.