दागिन्यांसाठी मित्राच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप; ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 06:42 AM2024-07-08T06:42:56+5:302024-07-08T06:44:18+5:30

आठ वर्षांपूर्वी काशिमीरा भागात ही घटना घडली होती.

Three get life imprisonment for murdering friend over jewellery Judgment of Thane District Sessions Court | दागिन्यांसाठी मित्राच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप; ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

दागिन्यांसाठी मित्राच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप; ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

ठाणे : मित्र शिवशंकर ऊर्फ निकू चौरसिया (वय २३) याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करणाऱ्या कमलेश सहानी (२६),  मन्टू पटेल (३०)  आणि रूपेश साह (२५) या तिघांना जन्मठेपेची  शिक्षा ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश वसुधा भोसले यांनी शनिवारी  सुनावली. आठ वर्षांपूर्वी काशिमीरा भागात ही घटना घडली होती.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर एका हॉटेलच्या बाजूला २३ नोव्हेंबर २०१६ राेजी शिवशंकर ऊर्फ निकू चौरसिया याचा मृतदेह काशिमीरा पाेलिसांना मिळाला हाेता. शिवशंकरच्या वडिलांची मुंबईतील नंदी गल्लीत पानपट्टी होती. या हत्येत सहभाग असलेला आरोपी रूपेशचा भाऊ संतोष हा शिवशंकरचे वडील (शिवप्रसाद) पानपट्टीजवळील इमारतीत सुरक्षारक्षक होते. तो या पानपट्टीवर किरकोळ काम  करीत असे. 

संतोष काही काळासाठी  गावी जातांना त्याच्या जागी वॉचमनच्या कामासाठी रूपेशला ठेवत असे. त्यातूनच रूपेशची  शिवशंकर आणि त्याच्या वडिलांशी चांगली ओळख झाली होती.  रूपेश जेव्हा गावावरून कामासाठी यायचा. तेव्हा तो गावातील कमलेश सहानी आणि त्याचा मित्र मन्टू  याला भेटण्यासाठी जात असे. रूपेश आणि मन्टू एकत्र पेंटिंगची कामेही करीत होते. या तिघांचा गावकीमुळे परिचय होता.  शिवशंकरशी या तिघांची ओळख झाली होती. शिवशंकरला सोन्याच्या दागिन्यांची आवड होती. तो सोन्याचे ब्रेसलेट, अंगठ्या आणि सोनसाखळी वापरायचा.   तिघांची नजर शिवशंकरच्या सोन्यावर होती. 

या खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयात ६ जुलै २०२४ रोजी झाली. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी पाेलिसांसह २१ साक्षीदार तपासले. सर्व साक्षी, पुरावे पडताळल्यानंतर न्यायालयाने कमलेश, मन्टू आणि रूपेश या तिघांनाही खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात दहा वर्षे कारावास तर पुरावा नष्ट केल्याने तीन वर्षे कारावास तसेच प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

असा रचला कट

रूपेश, कमलेश आणि मन्टू या तिघांनी संगनमताने  २२ नोव्हेंबर २०१६  रोजी  शिवशंकरला दारू पाजली.  नशेचे पदार्थही  त्याला दिले. नशेत असताना दगडाने ठेचून  तिघांनी त्याची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर काशिमीरा पोलिसांनी रूपेश आणि मंटू यांना ६ जानेवारी २०१७ रोजी तर कमलेशला ९ जानेवारी २०१७ रोजी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
 

Web Title: Three get life imprisonment for murdering friend over jewellery Judgment of Thane District Sessions Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.