रेल्वेमध्ये जबरी चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:44 AM2021-04-28T04:44:11+5:302021-04-28T04:44:11+5:30
ठाणे : रेल्वेमध्ये मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या समीर रफीक शेख उर्फ कालीमांग (रा.मुंब्रा) याच्यासह तिघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी नुकतीच ...
ठाणे : रेल्वेमध्ये मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या समीर रफीक शेख उर्फ कालीमांग (रा.मुंब्रा) याच्यासह तिघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याच्याकडून २९ मोबाइलसह तीन लाख २९ हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात त्याने या मोबाइलची चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एका जबरी चोरीच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या चौकशीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शेख याचा सहभाग उघड झाला. त्याच आधारे मुंबई लोहमार्गचे पोलीस आयुक्त कैसर खलीद, मध्य परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने तंत्रज्ञ पुष्कर झाटे यांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा यातील संशयित आरोपी हा औरंगाबाद येथे असल्याचे समोर आले. त्यानंतर, ठाणे रेल्वे पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने औरंगाबाद येथील नारेगाव, सिडको एमआयडीसी येथून समीर शेख याला २३ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ८६ हजारांचे आठ मोबाइल हस्तगत केले आहेत. या जबरी चोरीची त्याने कबुलीही दिली आहे. त्याच्यापाठोपाठ त्याचा साथीदार उबेदुल्ला शेख (४५) याला २४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे २७ एप्रिल रोजी रशीद शेख यालाही अटक करण्यात आली.
.............................
असे व्हायचे कामाचे वाटप
या तीन आरोपींमधील समीर हा रेल्वेमध्ये मोबाइलची जबरी चोरी करायचा. हे मोबाइल तो उबेदुल्ला याच्याकडे लॉक तोडण्यासाठी द्यायचा. त्यानंतर, रशीद हा या मोबाइलचे आयएमइआय क्रमांक बदल करीत होता. त्यानंतर, या मोबाइलची हे तिघे अल्प किमतीमध्ये विक्री करीत असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या हार्डडिस्क, वेगवेगळे सिम कार्ड आणि मेमरी कार्डही जप्त केले आहेत.