डिलिव्हरी बॉय सांगून जबरी चोरी करणारे त्रिकुट जेरबंद; ठाणे गुन्हे युनिट १ ची कामगिरी
By अजित मांडके | Published: November 12, 2022 06:11 PM2022-11-12T18:11:00+5:302022-11-12T18:11:56+5:30
नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास नौपाडा आणि ठाणे गुन्हे युनीट १ यांच्या मार्फत समांतर सुरू होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून घरात शिरकाव करत ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे केअरटेकर यांना लुबाडणाऱ्या ऋतिक रणजीत नेगी, शुभम बाळासाहेब फाफळे आणि मयूर रामदास महाले या तिघांना अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखा युनिटला यश आले आहे तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आला आहेत. अटकेतील चोरटे हे २० ते २२ वर्षीय असून दोघे ठाण्यातील, एक अहमदनगर येथील रहिवासी आहे. ठाण्यातील दुकली नवीमुंबई तर एका अहमदनगर येथून अटक करण्यात आली आहे.
नौपाडा परिसरात डिलिव्हरी बॉय असल्याची बतावणी करत, ज्येष्ठ नागरिक त्यांचे केअर टेकर यांना हेरत, तसेच त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून त्यांचे हात पाय बांधत. तसेच त्यांच्याकडे घरातील लॉकरची चावी मागणी करत. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी अशाप्रकारे घडलेल्या गुन्ह्यात त्यांनी केअर टेकर याच्या खिशातील रोकड जबरदस्तीने चोरली. तसेच दरवाज्या बाहेर कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने ते ड्रेनेज पाईपच्या साह्याने इमारतीखाली उतरून पळून गेले होते.
याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास नौपाडा आणि ठाणे गुन्हे युनीट १ यांच्या मार्फत समांतर सुरू होता. याचदरम्यान संशयित असलेले ऋतिक आणि शुभम हे दोघे नवीमुंबई परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि योगेश काकड यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली त्यांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर याला अटक केली. त्यांना नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"