भिवंडीत यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:37+5:302021-04-17T04:11:55+5:30
Bhiwandi : भिवंडी तालुक्यात काटई ग्रामपंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता.
भिवंडी : भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजू उर्फ रणछोड प्रजापती (५०), भगवान मामा (५५), मनसुख भाई (४५) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत.
भिवंडी तालुक्यात काटई ग्रामपंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता. कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्याने हा यंत्रमाग कारखाना मागील चार दिवसांपासून बंद होता व कारखान्याच्या जीर्ण झालेल्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. गवंडी कामगार व मजुरांमार्फत हे काम सुरू होते . यावेळी भिंतीचे काम करण्यासाठी मजुरांनी परांची देखील बांधली होती. त्यावर काम सुरू होते. मात्र हे काम सुरू असतांनाच लोखंडी अँगल व पत्राचा भार जीर्ण भिंतींवर पडल्याने भिंत कोसळली व त्यासोबतच छताचे लोखंडी अँगल व पत्राही खाली कोसळला. या
दुर्घटनेत तीन बांधकाम मजुरांचा
मृत्यू झाला आहे तर तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.