मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:31 AM2018-03-17T06:31:27+5:302018-03-17T06:31:27+5:30
कसारा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उंबरमाळी गावालगत मुंबई-नाशिक महामार्गावरील हॉटेल अमनसमोर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कंटेनरला शुक्रवारी एका गाडीने मागून धडक दिली.
कसारा : कसारा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उंबरमाळी गावालगत मुंबई-नाशिक महामार्गावरील हॉटेल अमनसमोर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कंटेनरला शुक्रवारी एका गाडीने मागून धडक दिली. या अपघातात तिघे जण जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा येथील आचोळे गावातून हेमंत चौधरी शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांना घेऊन शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघाले. ११.३०च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरून जात असताना उंबरमाळी येथील वळणावर हॉटेल अमनसमोर उभ्या असलेल्या कंटेनरवर चौधरी यांची गाडी धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, गाडीतील एअरबॅग्ज ओपन होऊन संपूर्ण गाडीच कंटेनरच्या खाली गेली. त्यात गाडीचालकासह अन्य दोघे जागीच ठार झाले, तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. रमेश खंडू नाईक (५५), मनोज चौधरी (२८) आणि हेमंत चौधरी (४४) (सर्व राहणार नालासोपारा, आचोळेगाव) अशी मृतांची नावे आहेत.
गाडीत मागच्या सीटवर बसलेले धनश्री हेमंत चौधरी (२०), धीरज हेमंत चौधरी (२६) आणि मधुमती हेमंत चौधरी (३८) ही आई आणि मुले गंभीर जखमी झाले असून त्यांना ठाणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कुटुंबप्रमुख हेमंत चौधरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती अद्याप त्यांना दिलेली नाही.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कोल्हे यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवले. रस्त्यावरच उभ्या असलेल्या या कंटेनरचालक-मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांनी केली आहे.
>उंबरमाळी गावालगत मुंबई-नाशिक महामार्गावरील हॉटेल अमनसमोर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कंटेनरला शुक्रवारी एका गाडीने मागून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, गाडीतील एअरबॅग्ज ओपन होऊन संपूर्ण गाडीच कंटेनरच्या खाली गेली.
रुग्णवाहिका नसल्याने उपचारास विलंब
अपघातस्थळी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कसारा पोलिसांच्या गाडीने तिघांना शहापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित तिघांपैकी दोघे जागीच गेले होते, तर एक जिवंत होता. परंतु, १०८ आणि हायवे मदत (पिक इन्फ्रा) वेळीच न पोहोचल्याने त्याला प्राण गमवावा लागला.