ठाण्यातील इमारत दुर्घटनेतील जखमींसाठी तीन लाखांची मदत
By जितेंद्र कालेकर | Published: May 17, 2023 11:34 PM2023-05-17T23:34:51+5:302023-05-17T23:35:02+5:30
नौपाडा, भास्कर कॉलनीतील अमर टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना साेमवारी घडली.
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नौपाडा, भास्कर कॉलनीतील अमर टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना साेमवारी घडली. या दुर्घटनेत विजया मोहन सुर्यवंशी, त्यांची दोन मुले प्रथमेश व अथर्व सूर्यवंशी हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमीची विचारपूस करीत उपचारामध्ये कोणतीही हयगय होणार नाही, अशा सूचना देउन या कुटुंबाला तीन लाख रुपयांची मदत दिली. ही मदत शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी विजया यांची मुलगी िप्रयंका सूर्यवंशी यांच्याकडे बुधवारी सुपूर्द केली.
सूर्यवंशी कुटुंबाला उपचारासाठी मुख्यमंत्री िशंदे यांनी तीन लाखांची मदत देवून आर्थिक सहकार्य केले. शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेवून ही मदत त्यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेनेचे विभागप्रमुख किरण नाक्ती तसेच अमर टॉवर सोसायटीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
अमर टॉवर दुर्घटनेचे वृत्त समजताच शिवसेनेचे विभागप्रमुख किरण नाक्ती यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य सुरू केले. तसेच सूर्यवंशी कुटुंबातील जखमींना नौपाड्यातील पराडकर रुग्णालय व कौशल्य रुग्णालय येथे दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. विजया सूर्यवंशी यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडले आहे. म्हस्के यांनी या दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली. ही इमारत ही २५ वर्षे जुनी असून या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करुन घेण्याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सूचित केले. तसेच सदर इमारतीचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने रहिवाशांना दिले.
अमर टॉवर इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी याठिकाणी जावून पाहणी केली. मात्र सर्वात प्रथम शिवसेनेने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. व या दुर्घटनेत जखमी झालेल्या सूर्यवंशी कुटुंबातील व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ संपर्क साधून जखमींची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांमार्फत केलेली तीन लाखांची मदत विजया सुर्यवंशी यांची मुलगी प्रियांका यांच्याकडे सुपुर्द केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे त्यांनी आभार व्यक्त केले. -नरेश म्हस्के, समन्वयक, शिवसेना महाराष्ट्र प्रदेश