ठाण्यातील माजी सैनिकाच्या तीन लाखांच्या दागिन्यांचा लागला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 11:05 PM2018-08-03T23:05:29+5:302018-08-03T23:13:10+5:30
एका रिक्षात प्रवासादरम्यान परशुराम पालांडे या माजी सैनिकाच्या पत्नीची साडे नऊ तोळयांच्या दागिन्यांची पर्स विसरली होती. कोणताही धागादोरा नसतांना पोलिसांनी ही पर्स अवघ्या काही तांसामध्ये शोधून काढली.
ठाणे : माजी सैनिकाच्या पत्नीचे सुमारे तीन लाखांचे साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच हजारांची रोकड असलेली पर्स वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शोधून काढली. ती पर्स या दाम्पत्याला गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी परत केल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.
वागळे इस्टेट, ज्ञानेश्वरनगर येथील रहिवासी परशुराम पालांडे (७५) हे पत्नी उज्ज्वला (७०) हिच्यासह १ आॅगस्ट २०१८ रोजी महाड येथून दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यात परतले. खोपट एसटी बसस्थानकातून ज्ञानेश्वरनगर येथील आपल्या घरी ते रिक्षाने आले. त्यावेळी दागिने आणि रोकड असलेली त्यांच्या पत्नीची पर्स मात्र ते रिक्षातच विसरल्याचे घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या रिक्षाची आणि पर्सची शोधाशोध केली. मात्र, त्यांना ती मिळाली नाही. अखेर, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्यांनी याप्रकरणी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट पोलिसांनी खोपट आणि परिसरातील सीसीटीव्हींची पडताळणी केली. तेव्हा फुटेजमध्ये रस्त्यावर एका ठिकाणी त्यांना ही रिक्षा आढळली. त्या रिक्षाला देवीचे चित्र असल्याचेही स्पष्ट झाले. त्यावरून त्यांनी ठाण्यातील अशा अनेक रिक्षांचा शोध घेऊन त्यातील या रिक्षाचा क्रमांक आणि मालकाचे नाव शोधले. वागळे इस्टेट मनीषानगर, साईश्रद्धा या चाळीतील हा मालक निघाला. त्याच्याकडील चौकशीत ही रिक्षा त्याने विकल्याची माहिती समोर आली. ज्याला रिक्षा विकली होती, त्या कोपरीतील झोपडपट्टीत पोलिसांनी ही रिक्षा शोधली. तेव्हा रिक्षामध्ये ती पर्स आहे, तशाच अवस्थेत मिळाली. तोपर्यंत २ आॅगस्ट रोजी पहाटेचे १ वाजले होते. अखेर, पहाटेच पालांडे दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावून पठाण आणि त्यांच्या पथकाने मंगळसूत्र, सोन्याचा हार, कर्णफुले, दोन अंगठ्या आणि अडीच हजार रुपये रोख हा लाखमोलाचा ऐवज त्यांना सुपूर्द केला. अवघ्या काही तासांनी आपला ऐवज जसाच्या तसा मिळाल्याने पालांडे यांनी पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.