फ्रेण्डशिप क्लबमध्ये ‘सेक्स’चे आमिष दाखवून सव्वा तीन लाखांची फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Published: November 29, 2018 07:27 PM2018-11-29T19:27:53+5:302018-11-29T19:35:36+5:30
फ्रेण्डशिप क्लबमध्ये सदस्यत्व घेतल्यास या क्लबमधील उच्चभ्रू महिलांशी सहज मैत्री करुन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवता येतात, असे अमिष दाखवून ठाण्यातील एका जेष्ठ नागरिकाला सव्वा तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. वेगळयाच प्रकारच्या या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावले आहेत.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : फ्रेण्डशिप क्लबमध्ये गुंतवणूक केल्यास उच्चवर्गातील महिलांकडून अनैतिक शरीरसंबंध ठेवण्यासाठी संमती दिली जाते, असे आमिष दाखवून तीन लाख ३० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल आणि समीर या दोघांविरुद्ध मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या क्लबमध्ये संबंधित तक्रारदाराने गुंतवणूक केल्यानंतर मात्र हा क्लब चालवणारे भामटे आता ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.
फ्रेण्डशिप क्लबमध्ये सदस्यत्व घेतल्यास या क्लबमधील उच्चभ्रू महिलांशी सहज मैत्री करता येते. क्लबमार्फत मैत्रीसाठी पुरवण्यात येणाऱ्या महिला क्लबमधील पुरुषांशी अनैतिक शारीरिक संबंध ठेवतात. त्या मोबदल्यात त्यांना प्रत्येक भेटीनंतर ७५ हजार रुपये तसेच अधिक ५० हजार रुपये दिले जातात, असे आमिष नौपाड्यातील एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फोनद्वारे दाखवण्यात आले होते. पण, क्लबचे सभासद होण्यासाठी रजिस्ट्रेशन शुल्क आणि त्या महिलांसोबत हॉटेलमध्ये जाण्यासाठी लागणारा खर्च यासाठी तीन लाख ३० हजारांची रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. मात्र, ती राहुल आणि समीरनामक व्यक्तींनी स्वीकारल्यानंतर ते दोघेही पसार झाले. त्यांनी अशा कोणत्याही फ्रेण्डशिप क्लबचे सदस्यत्वही त्यांना दिले नाही. त्यानंतर, त्यांना आलेल्या फोनवर त्यांनी वारंवार संपर्क साधला असता, हे फोन बंद आढळले. त्यानंतर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नौपाड्यातील या आंबटशौकिन ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. वेगळ्याच प्रकारे फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.