अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 10:17 PM2021-01-05T22:17:46+5:302021-01-05T22:21:44+5:30
सर्व बाजू पडताळल्यानंतर ठाण्याचे न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी सोमवारी तिन्ही आरोपींना प्रत्येक कलमाखाली प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावासाची तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका १५ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया मंगल चौधरी (२१, रा. कळवा, ठाणे), वरुण उपाध्याय (१९, रा. वाघोबानगर, ठाणे) आणि भूपेंद्र विश्वकर्मा (२०, रा. वाघोबानगर) या तिघा आरोपींना ठाणे न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कळवा, वाघोबानगर येथे राहणाºया या पिडित मुलीला त्याच परिसरातील आरोपी मंगल चौधरी आणि वरुण उपाध्याय यांनी गुंगीचे औषध लावलेल्या रुमालाचा वास दिला होता. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला पळवून नेऊन तिचा विनयभंग करुन तिच्यावर भूपेंद्र तसेच अन्य एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना १४ एप्रिल २०१४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात विनयभंग, लैंगिक अत्याचार करणे, पळवून नेणे तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम आदी कलमांखाली पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आरोपी मंगल आणि वरुण यांना १५ एप्रिल २०१४ रोजी तर भूपेंद्र याला १४ जून तर अन्य एका अल्पवयीन आरोपीला १९ एप्रिल २०१४ रोजी अटक केली होती. यामध्ये पाचवा आरोपी मात्र फरार झाला होता. पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर यांनी या प्रकरणाचा यशस्वीपणे तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून जमादार ज्ञानेश्वर ताजणे यांनी तर सरकारी वकील म्हणून उज्वला मोहळकर यांनी काम पाहिले. सर्व बाजू पडताळल्यानंतर ठाण्याचे न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी सोमवारी तिन्ही आरोपींना प्रत्येक कलमाखाली प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावासाची तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यातील चौथा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची भिवंडी येथील बाल न्यायालयात सुनावणी होणार आहे.