ग्लोबल हॉस्पिटलमधील बेड लाचप्रकरणी आणखी तिघांची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:04 AM2021-04-29T00:04:48+5:302021-04-29T00:07:38+5:30
ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणातील परवेझ शेख (४२, रा. बांद्रा, मुंबई) या डॉक्टरला ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणातील परवेझ शेख (४२, रा. बांद्रा, मुंबई) या डॉक्टरला ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये आणखी तिघांची लवकरच चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार हा गुन्हा २३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ग्लोबल रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तसेच रुग्णांना आवश्यकतेनुसार आयसीयू आणि ऑक्सिजन बेडही उपलब्ध करून देण्यात येतात. तरीही येथे रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप वसईतील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी केला होता. खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्याने ठाण्यातील या ग्लोबल रुग्णालयात दाखल करून, देतो असे सांगून रुग्णाच्या नातेवाइकांकडे दीड लाख रुपयांची मागणी करून हे पैसे घेण्यात आले होते. मनसेने याप्रकरणी कारवाईची मागणी केल्यानंतर महापौर म्हस्के यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याच प्रकरणामध्ये मे. ओमसाई आरोग्य केअर प्रा. लि. या खासगी कंपनीत सल्लागार असलेला डॉ. परवेझ तसेच नाझनीन, अबिद खान, ताज शेख आणि अब्दुल खान अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
कथित आरोपी डॉ. परवेझ याला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. याच कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर केल्यावर ठाणे न्यायालयाने त्याला ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
कथित आरोपींपैकी डॉ. नाझनीन या दिवसा आयसीयूच्या डयुटीवर होत्या. त्यावेळी ज्या रुग्णाला दाखल करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप होता. त्या रुग्णाकडून त्यांनी पैसेच घेतले नसल्याचे चौकशीत उघड झाले. त्यामुळे सध्या तरी डॉ. नानझीन यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे समोर आले आहे. तर यातील अन्य तिघांची नावे स्पष्ट होत असून त्यांना लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.