अवैध बांधकामांकरिता तिघांवर एमआरटीपी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 04:03 AM2019-02-20T04:03:46+5:302019-02-20T04:04:10+5:30
उल्हासनगरची घटना :विजेच्या धक्क्याने मजूर जखमी झाल्याने घेतली दखल
उल्हासनगर : कॅम्प नं-५, दुर्गापाड्यातील बांधकामाच्या साईटवर काम करणाऱ्या मजुराला उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीचा धक्का बसून गंभीर जखमी झाल्याने अवैध बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रभाग समिती क्रं-२ चे सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तिघांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. जखमी मजुराची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
उल्हासनगरात अवैध बांधकाम पडल्याने अनेकांचा यापूर्वी बळी गेला आहे. कल्याण-बदलापूर रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली अवैध बांधकाम साईटवर काम करणाºया मजुराला काही महिन्यांपूर्वी उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का बसून तो ९० टक्के भाजला होता. उपचारादरम्यांन त्याचा मृत्यू झाल्याने बांधकाम करणाºयावर गुन्हा दाखल झाला. तसाच प्रकार कॅम्प नं-५ दुर्गापाडा येथे मंगळवारी दुपारी घडला आहे. अवैध बांधकामावर काम करणाºया एका मजुराला उच्चदाबाच्या वाहिनीचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. खाजगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अवैध बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबधीत सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
कॅम्प नं-३ पवई चौकात अवैध बांधकाम सुरू असतांना स्लॅब पडून काही वर्षांपूर्वी तिघांचा बळी गेला तर बांधकामावरील उच्चदाबाच्या वाहिनीचा धक्का लावून अनेक बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला. उच्चदाबाच्या वाहिन्यांखाली अवैध बांधकामे उभी राहिली असून मोठी दुर्घटना होणार. तसे लेखी पत्र विद्युत वितरण विभागाने पालिकेला दिल्यावरही, अशा अवैध बांधकामांवर कारवाई झालेली नाही, अशी प्रतिक्रिया विद्युुत विभागाचे कार्यकारी अभियंता राठोड यांनी दिली. शहरातून जाणाºया कल्याण ते मुरबाड व कल्याण ते बदलापूर रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली शेकडो अवैध बांधकामे सुरू असून महापालिकेने बघ्याची भूमिका घेतली. यातूनच निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हवा
महापालिका आरक्षित भूखंड, खुल्या जागा, बांधकाम परवाने व रिक्स प्लॅनच्या नावाखाली बहुमजली अवैध बाधकामे शहरात सुरू आहेत. आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही काही प्रकरणात कारवाई झालेली नाही. मात्र अशा दुर्घटना होतच आहेत. त्यामुळे संबधीत पालिका अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.