पालिकेच्या कोविड रुग्णालयात तीन मुन्नाभाई एमबीबीएस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:35 AM2020-10-20T11:35:44+5:302020-10-20T11:36:48+5:30
या तिघांच्या विरोधात अहवाल तयार केला असून तो महापालिका आयुक्तांकडे पाठविला आहे. तूर्तास या डॉक्टरांना घरी बसविले आहे.
ठाणे: ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उत्तम उपचार केले जातात, असा दावा केला जात असला तरी, याच कोविड सेंटरमध्ये तीन बोगस डॉक्टर आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे महापालिकेने केलेल्या डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहे.
गोरगरीब कोरोना रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेने ११०० खाटांचे हे रुग्णालय उभे केले आहे. सुरुवातीला येथे डॉक्टरच उपलब्ध होत नव्हते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते घेतल्यामुळे रुग्णांना त्याचा फायदाही झाला. परंतु, आता याच रुग्णालयात बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये दोन इंटर्नशिप पूर्ण न केलेले तर एक डॉक्टर हा विद्यार्थी अशा तीन बोगस डॉक्टरांना पालिकेच्या आरोग्य विभागाने पकडले आहे. या तिघांच्या विरोधात अहवाल तयार केला असून तो महापालिका आयुक्तांकडे पाठविला आहे. तूर्तास या डॉक्टरांना घरी बसविले आहे.
प्रशासनाने डॉक्टरांच्या भरतीसाठी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. त्याच्याच माध्यमातून ही भरतीप्रक्रिया झाल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु, महापालिकेनेही याकडे लक्ष देणे गरजेचे होते.
आयसीयूमध्ये करीत होते रुग्णांची देखभाल
आयसीयूमध्ये रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. ग्लोबल कोविड सेंटरमध्येही तसे तज्ज्ञ होते. त्यांच्या मदतीला इंटर्नशिप पूर्ण न केलेले हे दोन डॉक्टरदेखील रुग्णांची देखभाल करायचे.