फेरीवाल्यांवरील कारवाईत कसूर करणारे तीन अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:02 AM2020-02-21T02:02:24+5:302020-02-21T02:02:29+5:30
स्कायवॉकची पाहणी : गर्दीत आयुक्तांनी खाल्ले धक्के
कल्याण : कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणास जबाबदार धरत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी तिघांवर निलंबनाची कारवाई केली. बुधवारी रात्री दोन्ही स्कायवॉकवर फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना किती त्रास होतो, याचा अनुभव आयुक्तांनी जातीने घेतला. त्यानंतर प्रभाग अधिकारी भरत पवार आणि दीपक शिंदे यांच्यासह फेरीवाला पथक प्रमुख गणेश माने यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले.
बुधवारी सार्वजनिक सुटी असतानाही आयुक्त महापालिका कार्यालयात कामकाजानिमित्त आले होते. आजच्या महासभेची तयारी त्यांनी केली. पटलावर चर्चेसाठी असलेल्या विषयांचा अभ्यास केला. सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास ते मुख्यालयातून बाहेर पडले. मात्र, घरी न जाता त्यांनी डोंबिवली गाठली. डोंबिवली रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावरून ते चालत गेले. या पुलावर फेरीवाल्यांचा बाजार भरल्याने त्यांना गर्दीत धक्के खावे लागले. नव्या आयुक्तांची ओळख नसल्याने फेरीवाले त्यांच्यासमोरच जोरात आवाज देत भाजीपाला विकत होते. त्यानंतर, आयुक्तांनी कल्याणच्या पादचारी पुलाकडे मोर्चा वळवला. याठिकाणीही आयुक्तांना तोच अनुभव आला. पाहणी आटोपल्यानंतर आयुक्त म्हणाले की, माझ्याकडे फेरीवाल्यांसंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून समस्येचे गांभीर्य समजून घेतले. नागरिकांना किती त्रास होतो, याची कल्पना या पाहणीतून आली. फेरीवाले हटविण्याची जबाबदारी ज्या विभागाची आहे, त्यांनी हे काम करावे. अन्यथा, कोणाचीही गय करणार नसल्याचा सज्जड इशारा आयुक्तांनी यावेळी दिला.
१४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द : तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी पालिकेतील १४ कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्या आयुक्त सूर्यवंशी यांनी रद्द केल्या. यासंदर्भात उपायुक्त मारुती खोडके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, १४ जणांच्या बदल्या यापूर्वीच्या आयुक्तांनी केल्या होत्या. नव्या आयुक्तांनी त्या रद्द केल्या. १४ पैकी ९ जणांनी बदलीच्या ठिकाणचा पदभार घेतला होता. मात्र, पाच जणांना नगररचना विभागात पाठविले होते. त्यापैकी एकानेही पदभार स्वीकारलेला नाही. सगळ्यांच्याच बदल्या रद्द झाल्याने ते पूर्वी होते, त्याच खात्यात कार्यरत राहणार आहेत.