ठाण्यात बिबटया आणि हरणाच्या कातडीची तस्करी करणा-या महिलेसह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:33 PM2017-12-22T21:33:56+5:302017-12-22T21:53:08+5:30
वन्यजीवांची शिकार करुन काढलेले अवयव आणि अवशेषाच्या अवैधरित्या व्यापा-यावर बंदी असतांनाही बिबटया आणि हरणाच्या कातडीची तस्करी करणा-या तिघांना कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
ठाणे: बिबटयाची दहा लाखांमध्ये तसेच हरणाच्या कातडीची पाच लाखांध्मये तस्करी
करणा-या शोभा तिवारी उर्फ शोभा मुरलीधर चौधरी (५०) या महिलेसह युनूस शेख (२५) आणि सतिश खोले (२६) या तिघांना कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून हरीण आणि बिबटयाच्या कातडीसह कार आणि तीन मोबाईल असा १८ लाख २१ हजार ३२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
कासारवडवली परिसरात बिबटया आणि हरणाच्या कातडीची विक्री करण्यासाठी तिघेजण येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांना एका खब-याने दिली होती. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक दत्ता ढोले, निरीक्षक कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. पाटील आदींच्या पथकाने हावरे सिटीकडे जाणा-या रस्त्यावरील टीएमसीच्या मोकळया मैदानातून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या तिघांना ताब्यात घेतले. ते दुपारी १.३० वाजता येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे या पथकाने दुपारी १ पासून या भागात सापळा लावला होता. त्यांच्याकडील एका पिशवीमध्ये या दोन्ही कातडी, मोबाईल आणि कार असा सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यांनी ही कातडी कोठून आणली होती, त्याची कोणाला विक्री करणार होते, याचा तपास सुरु असल्याचे निरीक्षक ढोले यांनी सांगितले.