‘दोस्ती रेंटल’च्या संक्रमण शिबिरातील तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:46 AM2017-10-28T03:46:27+5:302017-10-28T03:46:34+5:30
ठाणे : रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच पालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे : रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच पालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्तकनगरात ठाणे पालिकेने उभारलेल्या दोस्ती संक्रमण शिबिरांत लाभार्थ्यांऐवजी पोटभाडेकरूंकडून सदनिकांचा वापर होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. उपअभियंता प्रदीप घाडगे, दोस्ती रेंटल हाउसिंगचे व्यवस्थापक रत्नाकर सातपुते आणि दर्शना सावरकर यांच्या पथकाने अचानकपणे २१ आॅगस्टला छापा टाकून तपासणी केली होती. त्यात पोटभाडेकरू ठेवून दुप्पट भाडे आकारणी करून घरे दिल्याचे उघडकीस आले. त्याची कागदपत्रे तपासल्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी तबस्सुम जबार, मुरतुजा जबार, एम. डी. मुबीन, सुलताना मुबीन, शाहिन कुरेशी तसेच जिहंद कुरेशी यांच्या घरात जगदीश जुदिकया, नंदा ठाकूर आणि प्राची खाडे वास्तव्य करत असल्याचे आढळले. ठाण्यातील रस्ता रूंदीकरण आणि अन्य विकास प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना संक्र मण शिबिरांमध्ये राहण्यास जागा दिली होती. वर्तकनगर परिसरात ही शिबिरे असून तेथे महापालिकेने घरे दिली होती. दोन हजार रु पयांच्या शुल्कावर या सदनिका देण्यात आल्या असून संक्र मण शिबिर म्हणून या भागात सदनिका दिल्या जातात. काही सदनिकांमध्ये लाभार्थ्यांनी स्वत:ऐवजी पोटभाडेकरू ठेवल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, मालमत्ता विभागातील उपअभियंता प्रदीप घाडगे यांनी धाड टाकल्यानंतर हा प्रकार उघड झाला. चौकशीनंतर त्याबाबत गुन्हाही दाखल झाला.
>विश्वासघाताचा गुन्हा
पोटभाडेकरूंकडून ४ ते ५ हजार भाडे घेतले जात होते. पालिकेच्या परवानगीशिवाय घरे भलत्याच व्यक्तीला देऊन विश्वासघात केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पण अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.