इकबाल कासकरसह तीन जणांना खंडणीच्या गुह्यात न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 03:14 PM2017-10-14T15:14:34+5:302017-10-14T15:15:38+5:30
कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्यासह 3 जणांना खंडणीच्या गुह्यात ठाणे (सुट्टीच्या) न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
ठाणे - कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्यासह 3 जणांना खंडणीच्या गुह्यात ठाणे (सुट्टीच्या) न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. इक्बाल कासकर आणि दाऊद टोळीची सूत्रे हलवणा-या छोटा शकीलसह सात आरोपींवर पोलिसांनी बुधवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हे दाखल केले.
वरिष्ठ अधिका-यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून या आरोपींवर ‘मकोका’ लावण्यात येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वांत आधी प्रसिद्ध केले होते.ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाने गेल्या महिन्यात इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना अटक केली.
जागेच्या वादातून व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा एक गुन्हा त्यांच्यावर कासारवडवली येथे, तर दोन गुन्हे ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. एक महिन्याच्या तपासामध्ये पोलिसांनी जमा केलेले पुरावे आणि आरोपींच्या जबाबातून संघटित गुन्हेगारीवर शिक्कामोर्तब झाले.
संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी १९९९ साली ‘मकोका’ अस्तित्वात आला. या कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला सहा महिने अटकपूर्व जामीन मिळत नाही. न्यायालय आरोपीला एक महिन्याची पोलीस कोठडी देऊ शकते. इतर गुन्ह्यांमध्ये तीन महिन्यांच्या आत पोलिसांना आरोपपत्र दाखल करावे लागते. ‘मकोका’च्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना सहा महिन्यांचा अवधी मिळतो.
एकूण सात आरोपींवर नोंदवला गुन्हा-
‘मकोका’च्या प्रस्तावास वरिष्ठांची मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी कासारवडवली येथील खंडणीच्या गुन्ह्यामध्ये छोटा शकील, इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद, पंकज गंगर तसेच शम्मी आणि गुड्डू या बिहारच्या दोन शूटर्सवर ‘मकोका’अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इक्बाल कासकर, मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि पंकज गंगर हे सध्या पोलीस कोठडीत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.