उल्हासनगर महापालिकेच्या तिघांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती
By सदानंद नाईक | Published: October 16, 2024 07:51 PM2024-10-16T19:51:35+5:302024-10-16T19:52:34+5:30
एकून ४० कर्मचाऱ्यांना विविध पदावर पदोन्नती.
सदानंद नाईक, उल्हासनगर : वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसणाऱ्या तब्बल ५४ कर्मचारी व अधिकाऱ्याची बदली नंतर, आयुक्त विकास ढाकणे यांनी तिघांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती दिली. तर एकून ४९ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ लिपिक, तारतांत्री, विजतंत्री अधीक्षक पदी पदोन्नती दिल्याने, कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
उल्हासनगर महापालिकेत पदोन्नतीचा प्रश्न वर्षानुवर्षे भिजत पडला होता. कामगार संघटनेने पदोन्नतीसह वारसाहक्क, अनुकंप्पातत्वावर कर्मचारी घेण्याची मागणी केली होती. दरम्यान आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, किशोर गवस यांनी मंगळवारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून मक्तेदारी निर्माण करणाऱ्या तब्बल ५५ कर्मचाऱ्यांची बदली केली. त्यापाठोपाठ अलका पवार, सलोनी निवकर, विशाल कदम यांची सहायक आयुक्त पदी तर दोघांची अधिक्षक पदी पदोन्नती केली. यासह १२ लिपिकाची वरिष्ठ लिपिक पदी, ६ जणांची विजतंत्री तर १७ जणांची तारतंत्री पदी पदोन्नती केली. महापालिका आयुक्त ढाकणे या धाडसी निर्णयाने प्रथमच महापालिकेला स्थानिक ३ सहायक आयुक्त मिळाले असून भविष्यात यातूनच उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त पदी पदोन्नती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजय खेडकर व सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांनी सामान्य प्रशासन विभागाची अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया गतिमान केली. पहिल्या टप्प्यात ३ सहाय्यक आयुक्त, २ अधीक्षक, १२ वरिष्ठ लिपिक, ६ वीजतंत्री व १७ तारतंत्री या पदांवर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करून त्यांची येणारी दिवाळी गोड केली. आचारसंहितेनंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासून त्यांचाही पदोन्नतीसाठी निर्णय होणार असल्याचे लेंगरेकर म्हणाले. महापालिकेत अनेक वर्षापासून प्रभारी कर्मचाऱ्यांवर प्रशासन सुरू असून प्रथमच सहाय्यक आयुक्त हे महापालिका सेवेतील पदोन्नत अधिकारी म्हणून नियुक्त केले.