कोपरी आनंद नगर, गांधी नगर भागातील ५३ लोकांना विलगीकरण कक्षात केले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:32 PM2020-03-28T23:32:20+5:302020-03-28T23:32:43+5:30
एका वृध्द महिलेच्या संपर्कात आलेल्या तब्बल ५३ नागरीकांना पालिकेने खरबदाराची उपाय म्हणून घोडबंदर भागातील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. आता त्यांची तपासणी करुन पुढील दिशा ठरविली जाणार आहे.
ठाणे - कोरोना व्हायरसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने विविध पावले उचलली आहेत. दुसरीकडे कोपरीतील आनंद नगर आणि गांधी नगर भागातील तब्बल ५३ नागरीकांना पालिकेने रात्री उशिरा कासारवडवली येथील विलगीकरण कक्षात ठेवले असल्याची बाब समोर आली आहे. यातील पाच ते सात जण हे मुंलुड येथील खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या एका वृध्द महिलेच्या संपर्कात आले होते. त्या महिलेचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर पालिकेने हे पाऊल उचलले आहे. तसेच येथील ठाणे- मुलुंडला जोडणारा नाल्यावरील रस्ताही बंद करण्यात आला आहे.
मुलुंड भागात राहणारी एक ा वृध्द महिलेच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर सदर महिलेचा रिपोर्ट हा निगेटीव्ह आला होता. परंतु तीला चार दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने उपचारार्थ मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच खाजगी रुग्णालयात ठाणे पूर्वेतील आनंद नगर आणि गांधी नगर भागात राहणारे पाच ते सात नागरीक साफसफाईचे काम करीत होते. दरम्यान त्या महिलेचा रिपोर्ट हा पॉझीटीव्ह आल्यानंतर या नागरीकांच्या मनातही भिती निर्माण झाली. याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला झाल्यानंतर पालिकेने शनिवारी रात्रीच या भागाचा सर्व्हे करुन आनंद नगर आणि गांधी नगर भागातील तब्बल ५३ लोकांना ताब्यात घेऊन घोडबंदर भागातील कासारवडवली येथील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. सावधानतेचा उपाय म्हणून या सर्व नागरीकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील उपाय योजना केल्या जाणार असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून या भागातून मुलुंड येथे जाणारा नाला व त्यावरील रस्ता देखील आता बंद करण्यात आला आहे.