कोपरीत छताचे प्लास्टर पडून तीन जण जखमी
By जितेंद्र कालेकर | Published: June 16, 2024 06:25 PM2024-06-16T18:25:04+5:302024-06-16T18:26:25+5:30
त्या तिघांना तात्पुरत्या स्वरुपात त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळव्यात स्लॅब पडल्याची घटना ताजी असताना, कोपरीतील सुमारे ३० ते ३५ वर्षे जुने बांधकाम असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या छताचे प्लास्टर पडल्याची घटना रविवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत प्रदीप मोहिते (४६), यश मोहिते. (१६) आणि निधी मोहिते (१२) हे तिघे जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडले आहे. याठिकाणच्या २० सदनिकांमधील दहा आणि १२ सदनिकांमध्ये प्लास्टरला व कॉलमला तडे गेले आहेत. त्या तिघांना तात्पुरत्या स्वरुपात त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
कोपरीच्या मीठबंदर रोड या ठिकाणी तळ अधिक चार मजली श्रमदान सोसायटी ही प्रशासकीय इमारत आहे. या इमारतीच्या दुसºया मजल्यावरील रूम नं. दहा च्या छताचे प्लास्टर कोसळल्याची माहिती सागर व्यक्तीने फोनवरून रविवारी पहाटेच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिका अधिकाऱ्यांसह पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तातडीने जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचासाठी दाखल केले. तिघांच्या पायांना मार लागला आहे.
या इमारतीत २० सदनिका आहेत....
ही इमारत सी ३ अति धोकादायक मधील असून त्यांना नोटीस बजावलेली होती. इमारतीत एकूण २० - सदनिका असून तळ मजल्यासह चार मजल्यावर प्रत्येकी चार सदनिका आहेत. त्यातील १० ते १२ सदनिकांमध्ये प्लास्टरला व कॉलमला तडे गेले आहेत. इमारतीवरती ठामपा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्याकडून पुढील कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. श्रमदान सोसायटी इमारत क्रमांक तीन मध्ये एकूण अंदाजे ६० ते ६५ व्यक्ती राहत होत्या, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.