मीरारोडमध्ये तीन पोलिसांना डांबून ठेवत मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 09:23 AM2018-07-17T09:23:25+5:302018-07-17T10:40:13+5:30
तीन पोलिसांची सुटका करून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले
धीरज परब
मीरारोड - मीरारोड पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांना नशेत बेधुंद असणाऱ्या 14 जणांनी डांबून ठेवत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका इमारतीत पहाटेपर्यंत चाललेल्या मद्यधुंद पार्टीची तक्रार आल्याने तेथे गेलेल्या पोलिसांसोबत हा प्रकार घडला. पोलिसांचा मोठा ताफा आल्यानंतर या तीन पोलिसांची सुटका करून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
मीरारोडच्या पूनम गार्डन भागात समृद्धी नावाच्या इमारतीतल्या डी 603 क्रमांकाच्या सदनिकेत मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू असल्याची तक्रार पहाटे 5 च्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात आली. तक्रार मिळताच मीरारोड पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी सदर सदनिकेवर गेले. आतमध्ये हुक्क्याचा धुराडा आणि मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा सुरू होता. पोलिसांनी तक्रार आली असल्याने गोंधळ बंद करा असे सांगितले. त्यावर नशेत असणाऱ्या 14 जणांनी पोलिसांनाच डांबून ठेवत धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच एका पोलिसाचा मोबाईलही काढून घेतला.
एका पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ निरीक्षक वसंत लब्दे यांच्याशी संपर्क साधून आपल्याला डांबून मारहाण केल्याचे कळवले. लब्दे यांनी त्वरित नया नगर आदी जवळच्या पोलिसांना पण घटनेची माहिती देत पोलीस बळ मागवले. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाल्यावर तीन पोलिसांची सुटका करण्यात आली. 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
उज्वल कैलासचंद्र त्रिवेदी (26), चिराग कैलासचंद्र त्रिवेदी (31), श्रीयांश मनीष शहा (21), कृष्णा दीपक अग्रवाल (21), तन्मय नितीन राणे (25), रिकी सुरेश कोटी (29), दीपेश दिनेश गोहिल (26), वृषभ शैलेश बरवालिया (29), निखिल केरीर मस्कारिया (35), राजवीर केजरीन पीटर मिनिजोस (26), राहुल रमेश परुळेकर (26), अजय शैलेंद्रप्रताप सिंग (26), शिप्रा चिराग सिंग (28), रेखा राजेश पिंपळकर (38) अशी ताब्यात घेतलेल्या लोकांची नावं असून हे सर्व मीरारोडचे रहिवासी आहेत.पार्टी सुरू असताना हुक्का आणि मद्यसेवन चालले होते. त्यामुळेच ताब्यात घेतलेल्या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. 14 जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे लब्दे यांनी सांगितले.