तीन खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ते कोठडीत, मागितला होता फ्लॅट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 04:51 AM2018-11-16T04:51:42+5:302018-11-16T04:52:10+5:30
आठ लाखांची वसुली : मागितला फ्लॅट
डोंबिवली : अनधिकृत बांधकामांविरोधात माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून केडीएमसी मुख्यालयासमोर उपोषणास बसलेला माहिती अधिकार कार्यकर्ता कल्पेश जोशी याच्यासह त्याचा भाऊ विनोद जोशी आणि आठ लाख रुपयांची खंडणी स्वीकारणाऱ्या वसंत जोशी या तिघांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने बुधवारी अटक केली. कल्याण न्यायालयाने या तिघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात वार्तापत्राच्या माध्यमातून माहिती अधिकार कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो, याबाबतचे वास्तव मांडले होते. ठामपामध्ये यापूर्वी खंडणीविरोधी पथकाने कारवाई केली आहे. त्याच धर्तीवर आता कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही अशा प्रकारे गुन्हे दाखल होऊ लागले आहेत.
पूर्वेतील दत्तनगरमध्ये राहणाºया एका व्यावसायिकाचे नेमाडे गल्ली परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम त्यांचा भागीदार पाहत असतो. या बांधकामाविरोधात माहिती अधिकार कायद्यान्वये कल्पेश याने पालिकेकडे अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्याच्या मोबदल्यात कल्पेशने बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली. खंडणीची रक्कम न दिल्याने गळ्यात पाटी अडकवून कल्पेशने या बांधकामाविरोधात केडीएमसी मुख्यालयासमोर अनोखे आंदोलनही केले होते. तसेच सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे आणि बॅनरद्वारे बदनामीची धमकी कल्पेश त्या व्यावसायिकाला देत होता. आतापर्यंत कल्पेशने त्याच्याकडून चार लाख ७० हजार रुपये रोख घेतले. आता त्या बांधकाम व्यावसायिकाकडे एक रूम अथवा ३० लाखांची मागणी कल्पेशने केली. दररोजच्या त्रासाला कंटाळून या व्यावसायिकाने ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली.
अधिक तपास सुरू
बांधकाम व्यावसायिकाकडून आठ लाख स्वीकारणाºया वसंत जोशीसह कल्पेश आणि विनोद या तिघांना खंडणीविरोधी पथकाने बुधवारी रात्री ९ च्या सुमारास अटक केली. अधिक तपास खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आर.एम. कदम करत आहेत.