ठाण्यात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी लुटली २५ लाखांची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:08 PM2018-04-01T22:08:11+5:302018-04-01T22:08:11+5:30
दुकानांमधील रोकड बँकेत जमा करणाऱ्या खारघर येथील रेडीएंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खासगी वित्तीय कंपनीच्या कर्मचा-याकडील २४ लाख ६० हजारांची रोकड तिघांनी लुटण्याचा प्रकार शनिवारी घोडबंदर रोड येथे घडला.
ठाणे : घोडबंदर रोडवरून कासारवडवलीकडे दुचाकीवरुन जाणा-या बापी रॉय (२१, रा. वारलीपाडा, श्रीनगर) यांच्या पाठीमागून आलेल्या तिघा लुटारुंनी त्याच्याजवळील २४ लाख ६० हजारांची रोकड लुटल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
रॉय हे विविध खासगी संस्था तसेच दुकानांची रोकड जमा करुन ती बँकेत भरणा करणा-या नवी मुंबर्इंतील खारघर येथील रेडीएंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खासगी वित्तीय कंपनीत नोकरीला आहेत. ३१ मार्चला दुपारी १२.४५ ते १ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी विवियाना मॉलमधील विविध दुकानांमधील रोकड जमा केली. ती कासारवडवलीतील एका बँकेत भरण्यासाठी ते जात होते. पातलीपाडा उड्डाणपूल चढत असतांना त्यांच्या पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांच्या टोळक्यापैकी सर्वात मागे बसलेल्या लुटारुने त्यांच्यावर हात उगारला. त्यानंतर मध्ये बसलेल्याने त्यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावली. अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या या थरारनाट्यानंतर हे त्रिकुट घोडबंदर रोडच्या दिशेने पळून गेले. या प्रकरणी रॉय यांनी चितळसर पोलीस ठाण्यात रात्री रोकड लुटल्याची तक्रार दाखल केली.
आरोपींच्या शोधासाठी पाच पथके
लुटीचा प्रकार घडल्यानंतर चितळसर पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या अधिकाºयांनीही घटनास्थळी भेट दिली. आरोपींच्या शोधासाठी चितळसर पोलीस ठाण्यातील पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत. शिवाय, घोडबंदर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेही या लुटारुंचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
माहितगाराकडून खबर
रॉय हे रोकड जमा करणा-या खासगी संस्थेत नोकरीला असल्याची आणि ते इतकी मोठी रोकड अशा प्रकारे घेऊन जात असल्याची माहिती त्यांच्या जवळच्याच एखाद्या व्यक्तीने लुटारूंना दिली असावी किंवा आधीपासूनच त्यांच्या पाळतीवर असणा-यांनी ही लूट केल्याची शक्यता आहे. माहितगाराकडूनच या लुटारुंना माहिती पुरविल्याचीही शक्यता आहे. या लुटारुंकडे कोणतेही शस्त्र नव्हते, असेही पोलिसांनी सांगितले.