भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गोदामांच्या आठवड्यातून तीन सुट्यां विचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:31 PM2018-09-09T16:31:23+5:302018-09-09T16:46:09+5:30
गोदामांमुळे भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात होते. ती कमी करण्याचा दृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सूचना केल्या होत्या. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तहसीलदार, वाहतूक संघटना व गोदाम मालकांची बैठक तातडीने घेण्याचे निर्देश डॉ. नळदकर यांना दिले. त्यानुसार पहिली बैठक घेण्यात आली.
ठाणे : येथील मुंब्रा बायपास सोमवारपासून सुरू होईल. तरी देखील मागील अनुभव लक्षात घेता भिवंडी परिसरात वाहतूक कोंड होईल. यावर वेळीच उपाययोजना म्हणून भिवंडीच्या गोदामांना वेगवेगळ्या दिवशी आठवड्यातून तीन सुट्या देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. यासाठी शनिवारी बैठक घेऊन त्यात प्राथमिक पातळीवरील हा निर्णय भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी वाहतूक संघटना व गोदाम मालकांना विश्चासत घेऊन घेतला.
गोदामांमुळे भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात होते. ती कमी करण्याचा दृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सूचना केल्या होत्या. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तहसीलदार, वाहतूक संघटना व गोदाम मालकांची बैठक तातडीने घेण्याचे निर्देश डॉ. नळदकर यांना दिले. त्यानुसार पहिली बैठक घेण्यात आली. त्यात वेगवेगळ्या दिवशी तीन सुट्या घेणे शक्य आहे का, याविषयी चर्चा झाली. तरी देखील यावर शिक्का मोर्तब करण्यासाठी लवकरच दुसरी बैठक घेण्यात येईल, असे डॉ. नळदकर यांनी लोकमतला सांगितले.
वेगवेगळ्या दिवशी तीन सुट्या लागू झाल्यानंतर या गोदामांची रविवारची साप्ताहीक सुट्टी मात्र रद्द होईल. यानंतर पूर्णा, राहनाळ परिसरातील गोदामांना मंगळवारी सुटी मिळेल. तर काल्हेर, कशेळी भागातील गोदामांना बुधवारी सुटी राहील. तसेच दापोडे, वळ भागातील गोदामे शुक्रवारी बंद राहतील. या सुट्या विभागल्याने भिवंडी परिसरातील गोदामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा ताण पडणार नाही. यावर पहिल्या बैठकीत चर्चा झाली. पण त्यासाठी लवकरच दुसरी बैठक आयोजित करण्यात येईल. यामध्ये वाहतूक पोलिस, पोलिस, गावपातळीवरील ग्राम सेवक, तलाठी, पोलिस पाटील आदी सरकारी प्रतिनिधींसह गोदाम मालक आणि वाहतूक संघटना आदींचा समावेश राहील. त्यांच्या समक्ष या लागू होणाऱ्या तीन दिवशीय सुट्यांवर पुन्हा चर्चा होईल. या सुट्यांमुळे काय परिणाम होईल, अन्य काही समस्या उद्भतील का आदींवर या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर या तीन दिवशीय सुट्यांचा निर्णय घेणार असल्याचे डॉ. नळदकर यांनी स्पष्ट केले. शनिवार पार पडलेल्या या बैठकीला तहसिलदार शशिकांत गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त अविनाश मोहिते, पोलीस निरीक्षक राजन रास्ते, एम एन सातिदवे, आर. पी. भामे आणि गोदाम मालक आदींची उपस्थित असल्याचे डॉ. नळदकर यांनी सांगितले.