डोंबिवली स्थानकात रेल्वेचे तीन मजली पार्किंग करा, रवींद्र चव्हाण यांनी केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 02:52 AM2018-08-14T02:52:12+5:302018-08-14T02:53:27+5:30
येथील रेल्वेस्थानकात पूर्व आणि पश्चिमेला मध्य रेल्वेची पार्किंग सुविधा आहे. ती सुविधा तातडीने तीन मजली करावी, जेणेकरून रेल्वेस्थानकाच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांची गैरसोय होणार नाही.
डोंबिवली - येथील रेल्वेस्थानकात पूर्व आणि पश्चिमेला मध्य रेल्वेची पार्किंग सुविधा आहे. ती सुविधा तातडीने तीन मजली करावी, जेणेकरून रेल्वेस्थानकाच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांची गैरसोय होणार नाही. तिथे चारचाकी वाहनांसाठीही सुविधा असावी, अशी मागणी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
रायगड जिल्ह्यामधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या तसेच ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, कोपर, दिवा, ठाकुर्ली आदी स्थानकांमधील गैरसोयींसह अपेक्षित सुविधांबाबत चव्हाण यांनी चर्चा केली. वाहनतळासंदर्भात रेल्वेमंत्री गोयल यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना तत्काळ अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले. येथील पश्चिमेला असलेल्या रेल्वेच्या भूखंडाची दुर्दशा झाली असून तेथेही तातडीने सर्व सुविधा द्याव्यात, जेणेकरून खेळाडूंना तेथे सराव करणे सोपे जाईल. रेल्वेला शक्य नसेल तर त्या मैदानाच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी चव्हाण यांनी दर्शवली. त्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करून, मैदान खेळाच्या दृष्टीने विकसित करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव आहे. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातून ठाणे, कळवा, दिवा, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा आदी भागांमधून लाखो प्रवासी कोकणात जातात. मात्र, दिवा स्थानकात कोकणात जाणाºया गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना कुटुंबासह जातायेताना ठाणे, पनवेल येथून प्रवास करावा लागतो. ते प्रचंड त्रासाचे आहे. त्यासाठी येत्या गणेशोत्सवात नियोजन करताना अधिकाधिक गाड्या दिवा स्थानकातही अपडाउन मार्गावर थांबतील, याची काळजी घ्यावी. अन्यथा, प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, असे ते म्हणाले. त्याबाबतची माहिती घेऊन आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे गोयल म्हणाले. ठाकुर्ली स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूल, डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाची डागडुजी, स्वयंचलित जिन्यांच्या समस्या, त्यात वाढ आदी मुद्यांवरही यावेळी चर्चा झाली. स्थानकांमधील स्वच्छतागृहांच्या बकाल अवस्थेवर चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. महिला सुरक्षा, गर्दीच्या वेळांमधील नियोजन, महिला विशेष लोकल आदी मुद्यांवरही गोयल यांच्यासमवेत चर्चा करण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार सोमवारी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के. जैन यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत डोंबिवलीसह ठाकुर्ली, कोपर, दिवा आदी स्थानकांसंदर्भात चर्चा केली.
महिनाभरात अहवाल
रवींद्र चव्हाण यांचे म्हणणे ऐकून घेत महिनाभरात अहवाल देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार ठाकूर हेही उपस्थित होते. दिवा स्थानकात गाड्यांना गणेशोत्सवात थांबा देण्यासंदर्भात रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी सकारात्मक भूमिका घेतली. डोंबिवलीच्या वाहनतळाची कल्पना स्तुत्य असून त्यानुसार तातडीने उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.