तीन चोरट्यांना अटक, सव्वा तीन लाखांचे मोबाईल लॅपटॉप केले जप्त
By नितीन पंडित | Published: May 19, 2024 07:15 PM2024-05-19T19:15:42+5:302024-05-19T19:15:52+5:30
भिवंडीत गुन्हे शाखेची कारवाई
भिवंडी: शहरात वाढत असलेल्या मोबाईल चोरी सोबतच घरपोडीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाने विशेष पथकामार्फत कारवाईचे आदेश दिल्यानंतर भिवंडी गुन्हे शाखेने तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या जवळून मोबाईल व लॅपटॉप असा तीन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
भिवंडी परिमंडळ दोन परिक्षेत्रा मधील घरफोडी, मोबाईल चोरीच्या गुन्हयांचे तपासाबाबत विशेष पथक तयार करून गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिल्या नंतर भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी,धनराज केदार,पोलिस कर्मचारी अमोल देसाई,प्रकाश पाटील, देवानंद पाटील,किशोर थोरात,सचिन जाधव,अमोल इंगळे,उमेश ठाकुर,भावेश घरत,सचिन सोनावणे,नितीन बैसाणे हे तपास करीत असताना अमोल इंगळे यांना घरफोडी चोरी मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या चोरट्यां बद्दल माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी कैफ इसरार सिद्धीकी,वय १९ वर्षे,रा.पटेल कंपाऊंड, धामणकर नाका,अंकीत तेजाराम गुप्ता,वय १९ वर्षे,रा. शांतीनगर या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्या जवळून भिवंडी शहर व निजामपूर पोलिस ठाणे हद्दीतून चोरलेले पाच मोबाईल व यंत्रमाग कारखान्यात घरफोडी केलेल्या गुन्ह्यातील १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .या दोघा आरोपींचा एक साथीदार लाला उर्फ साहेल याचा पोलिस शोध घेत आहेत.
तर दुसऱ्या एका गुन्ह्याचा समांतर तपस करीत असताना पोलिस शिपाई उमेश ठाकुर यांना गुप्त बातमीदार मार्फत एका आरोपींची माहिती मिळाली.त्यानुसार मोहम्मद सैफ जावेद खान,रा. रावजीनगर, कल्याण रोड यास ताब्यात घेत त्याच्या घराची झडती घेतली असता तेथून भिवंडी शहर व शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेला एक लॅपटॉप व ५ मोबाईल असा १ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या दोन्ही कारवाईत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.