कोरोनाला वाकुल्या दाखवून वर्षभरात झाले तीन हजार ८३७ विवाह; ठाण्यात दिवाळीनंतर विवाहांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 10:59 PM2021-04-27T22:59:50+5:302021-04-27T22:59:59+5:30
ठाण्यात दिवाळीनंतर विवाहांची संख्या वाढली
स्नेहा पावसकर
ठाणे : गेल्या वर्षी कोरोना आला आणि आपण सगळेच लॉकडाऊनमुुळे घरात बसलो. पण काही महिने जसे हळूहळू अनलॉक होऊ लागले तसे पुन्हा एकदा कार्यालये, व्यवहार, उत्सव, सोहळ्यांना थोडक्या माणसांमध्ये करण्याची परवानगी मिळू लागली. कोरोनाची धास्ती तर गेले वर्षभर आपण घेऊन फिरतोय. पण त्यातही त्याच कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या मार्चपासून ते या मार्चपर्यंत ठाणे जिल्ह्यात सुमारे ३,८३७ जोडप्यांनी रजिस्टर्ड मॅरेज केले.
कोरोना महामारीला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. मध्यंतरीच्या काळात सण, उत्सव, घरगुती सोहळे, विवाह यांना मोजक्या माणसात करण्याची मुभा दिली होती. तसे नियम घातले होते. काही ठिकाणी हे नियम मोडले गेले खरे; पण ठाणे जिल्ह्यात मात्र गेल्या वर्षभरात नियम पाळत लग्नसोहळे झाले.
विशेष म्हणजे वारेमाप खर्च टाळण्याच्या दृष्टीने आणि कमी माणसांच्या उपस्थितीचे बंधन असल्याने अनेकांनी नोंदणी करून रजिस्टर्ड मॅरेज करण्यावर भर दिलेला पाहायला मिळाला. २०२० मध्ये एप्रिल महिन्यात कडक लॉकडाऊन होता. परिणामी कोणीही घराबाहेर पडले नाही किंवा लग्नाच्या दृष्टीने नियोजन केले नाही. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये एकही विवाह ठाण्यात झाला नाही. तर तुलसी विवाहानंतर मुहूर्त पाहून अनेकांनी लग्नाचा बार उडवला. इतकेच काय तर मुहूर्त नसतानाही गेल्यावर्षी अनेकांनी लग्नसोहळे उरकले.
अनेकांचे विवाह लांबणीवर
गेल्यावर्षी अनलॉकनंतर काही प्रमाणात विवाह सोहळे झाले. मात्र ते अगदी नगण्य होते. अन्यथा आमच्याकडे एकाच दिवशी खूप विवाह होतात. परंतु त्यांची संख्या मे ते ऑक्टोबरपर्यंत कमी होती. मात्र तुलसी विवाह झाल्यावर पुन्हा विवाहसंख्या वाढली. त्याचदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भावही ओसरला होता. मात्र आता पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढू लागल्याने अनेक विवाहइच्छुकांनी आपले मुहूर्त पुढे ढकलले आहेत, अशी माहिती एका मंगल कार्यालय चालकाच्या कर्मचाऱ्याने दिली.
अनेक वस्तू मनासारख्या मिळाल्याच नाहीत
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन झाले. पण त्यातही केवळ एप्रिलचा महिना सोडला तर अनेकांनी उर्वरित महिन्यांत अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या माणसात विवाह सोहळे केले. त्यावेळी विवाहासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूही लॉकडाऊनमुळे काहींना खरेदी करता आल्या नव्हत्या. मात्र जे उपलब्ध आहे त्यात तडजोड करून अनेक जण जोडपी विवाहासाठी पोहोचली होती.