पहिल्या टप्प्यात तीन हजार फ्रंटलाइन वर्करना आज लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:06 AM2021-01-16T00:06:45+5:302021-01-16T00:07:01+5:30
लसीकरणासाठी २९ केंद्रे सज्ज : आरोग्य विभागाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील अनेक महिन्यांपासून कोरोना या आजाराने थैमान घातलेले असताना, या आजारावरच्या लसीची प्रतीक्षा संपुष्टात आली असून देशभरासह राज्यात शनिवारपासून या लसीकरण मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा आणि ग्रामीण भागातील २९ केंद्रांवर या मोहिमेला सुरुवात होणार असून प्रत्येक केंद्रावर १०० फ्रंटलाइन वर्कर याप्रमाणे सुमारे तीन हजार वर्करना लस देण्यात येणार आहे. यासाठी २९ केंद्रांवर लसीकरणाच्या नियमावलीप्रमाणे सर्व सोयीसुविधादेखील उपलब्ध केल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला प्रत्यक्ष लसी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्याने रुग्णांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी ७४ हजार लसी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील २९ केंद्रांवर त्या वितरित केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका व ग्रामीण क्षेत्र मिळून ६२ हजार ७५० फ्रंटलाइन वर्करची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार, १६ जानेवारीपासून या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २९ लसीकरण केंद्रे सज्ज असून त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर तीन वेटिंग रूम तयार केल्या असून लसीकरण केलेले वर्कर व रुग्ण या ठिकाणी निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. तसेच लस दिल्यानंतर कोणावर त्याचे परिमाण होतात का, याचे निरीक्षणदेखील यावेळी करण्यात येणार आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी, मीरा-भाईंदर, शहापूर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतील २९ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे सुमारे तीन हजार फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यात कुठे-कुठे होणार कोरोना लसीकरण?
n ठाणे पालिका क्षेत्र : रोझा गार्डन, कळवा आरोग्य केंद्र, कौसा आरोग्य केंद्र, कोरस आरोग्य केंद्र.
n नवी मुंबई पालिका क्षेत्र : वाशी रुग्णालय, ऐरोली रुग्णालय, डी.वाय. पाटील रुग्णालय नेरूळ, रिलायन्स हॉस्पिटल कोपरखैरणे, अपोलो हॉस्पिटल बेलापूर.
n कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्र : शास्त्रीनगर रुग्णालय, रुक्मिणीबाई रुग्णालय आणि शक्तिधाम क्वारंटाइन सेंटर.
n उल्हासनगर पालिका क्षेत्र : आयटीआय कोविड सेंटर.
n ग्रामीण क्षेत्र : ठाणे जिल्हा सामान्य (सिव्हिल) रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शहापूर, छाया रुग्णालय अंबरनाथ आणि दुबे रुग्णालय, बदलापूर.