ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये रस्ता खचल्याने तीन वाहने २० फूट खड्डयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 20:20 IST2018-06-09T20:20:47+5:302018-06-09T20:20:47+5:30
वर्तकनगर येथील एका इमारतीच्या पायाभरणी खोदकामाला लागूनच असलेला रस्ता मोठया प्रमाणात खचल्यामुळे या भागातील तीन वाहने २० फूट खोल खड्डयात कोसळली.

पाया भरणी खोदकामाच्या लगताचा रस्ता
ठाणे: एका खासगी विकासकाच्या चुकीमुळे वर्तकनगर इमारत क्रमांक ६१ च्या बाजूला असलेला रस्ता शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अचानक खचला. त्यामुळे दोन रिक्षांसह एक मिनी स्कूल बस २० फूट खोल खड्डयात कोसळल्या. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही.
वर्तकनगर इमारत क्रमांक ६१ च्या बाजूलाच एम. एस. बिल्डर यांच्या वतीने इमारत बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मलगे या विकासकाने तिथे पाया उभारणीसाठी २५ फूट खोल खड्डाही केला आहे. बांधकामाला लागूनच याठिकाणी पत्रेही लावलेले आहेत. जवळच असलेल्या गटाराला लागूनच पाया उभारणीचा हा खड्डा ऐन पावसाळयात केल्याने शनिवारी सकाळी गटाराच्या बाजूचा पूर्ण रस्ता खचला. त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या दोन रिक्षा आणि एक मिनी स्कूल बसही या २० फूट खोल खड्डयात कोसळल्या. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने ही वाहने खड्डयातून बाहेर काढली. दरम्यान, संबंधित विकासकावर कारवाई करण्याची तसेच पावसाळयात खोदकाम न करण्याची मागणी मनसेचे वर्तकनगर शाखा अध्यक्ष संतोष निकम यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
‘‘या विकासकाने पावसाळयापूर्वीच इमारतीच्या पाया भरणीचे खोदकाम करणे आवश्यक होते. ऐन पावसाळयात त्याने हे काम सुरुच ठेवले. शिवाय, गटाराला लागून असलेल्या भागावरही खोदकाम झाले. त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. पावसाळयात पालिकेने अशा खोदकामांना परवानगी देऊ नये अशी मागणी पालिकेकडे करणार आहे.’’
संतोष कदम, शाखाअध्यक्ष, वर्तकनगर, महाराष्टÑ नवमिर्माण सेना.