तिघांवर घरात घुसून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:02+5:302021-02-23T05:01:02+5:30

कल्याण : घरात घुसून तिघांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना पश्चिमेतील सापर्डे गावात रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास ...

Three were stabbed in the house | तिघांवर घरात घुसून प्राणघातक हल्ला

तिघांवर घरात घुसून प्राणघातक हल्ला

Next

कल्याण : घरात घुसून तिघांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना पश्चिमेतील सापर्डे गावात रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास घडली. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. ज्या घरात हा हल्ला झाला, त्याच्या शेजारच्या घरात हळदी समारंभ चालू होता. हल्ल्यामागे लूटमारीचा हेतू होता का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या घटनेचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.

रविवारी रात्री सापर्डे गावात लग्नकार्यानिमित्त हळदीचा कार्यक्रम सुरू होता. गावातील लोक या कार्यक्रमात व्यस्त होते. त्याचवेळी ही घटना घडली. सुवर्णा घोडे हे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे हे मायलेक गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हळदी समारंभ सुरू असल्याचा फायदा उठवीत या तिघांवर अज्ञातांनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. यात सुवर्णा यांचा जागीच मृत्यू झाला, तर भारती आणि त्यांचा मुलगा पवन हे दोघे बेशुद्धावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यामागचे नेमके कारण काय? हल्लेखोर कोण होते? ते परिचित होते? का, याचा तपास सुरू असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.

मृत महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्याने लूटमारीच्या उद्देशाने ही घटना घडली असावी, अशी चर्चा असून लवकरात लवकर पोलिसांनी आरोपींचा छडा लावावा, अशी मागणी माजी नगरसेवक जयवंत भोईर यांनी केली आहे. दरम्यान, मृत महिलेच्या अंगावर दागिने जैसे थे होते, त्यामुळे लुटीच्या उद्देशाने हत्या झालेली नसावी. अन्य कोणते तरी कारण यामागे आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक पवार म्हणाले.

-----------------------------------------------------

Web Title: Three were stabbed in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.