शॉक लागल्याने तीन कामगारांचा मृत्यू, अंबरनाथच्या जलशुद्धीकरण केंद्रात टाकी बांधताना दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:50 PM2024-04-05T12:50:23+5:302024-04-05T12:51:13+5:30
Ambernath Accident News: अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रामध्ये पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू असताना शॉक लागल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
अंबरनाथ - अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रामध्ये पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू असताना शॉक लागल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. शालिग्राम मंडल (१८), गुलशन मंडल (१८), राजन मंडल (१९) अशी मृतांची नावे आहेत.
काम करताना तेथे साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याचा पंप लावला होता. अचानक हा पंप बंद पडल्याने सहा कामगार पंप सुरू करण्यासाठी गेले. त्यातील तिघांनी पंप उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शॉक लागला. या दुर्घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाला. मात्र, दोन कामगारांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.
सुरक्षेची साधने दिली नाहीत
बारवी नदीतून पाणी उचलून ते पाणी संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पुरवठा करण्यासाठी नव्याने जलशुद्धीकरण केंद्राची बांधण्याचे काम सुरू आहे. जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच नव्याने केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर ठेकेदाराने दुर्लक्ष केले. काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची साधने न दिल्याने त्यांना जीव गमवावा लागला, अशी चर्चा सुरू आहे.