भिवंडीत यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी
By नितीन पंडित | Updated: April 1, 2024 13:47 IST2024-04-01T13:46:54+5:302024-04-01T13:47:08+5:30
सोमवारी पहाटे या यंत्रमाग कारखान्याचे लोखंडी अँगलसह पत्रा आणि चारी बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्याने दुर्घटना घडली आहे.

भिवंडीत यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी
भिवंडी: शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.फंडोले नगर परिसरातील रेहमान कंपाऊंड येथे धोकादायक ठरवण्यात आलेले नागाव येथे शब्बु शेख यांच्या मालकीचे दोन यंत्रमाग कारखाने आहेत.
सोमवारी पहाटे या यंत्रमाग कारखान्याचे लोखंडी अँगलसह पत्रा आणि चारी बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. या कारखान्या मध्ये आठ मजूर काम करत होते. रमजान महिना असल्याने पहाटेच्या वेळी पाच मजूर नाश्त्या साठी कारखान्याच्या बाहेर गेले होते. त्यामुळे या दुर्घटनेत कारखान्या मध्ये काम करणारे आर्वेद, समशाह आलम,मोहम्मद कलाम खान असे तीन कामगार कोसळलेल्या ढिगाराखाली अडकले होते.
घटनेची माहिती मिळतात स्थानिकांनी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने ढिगाऱ्यखाली अडकलेल्या तीन मजुरांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस, पालिका आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले. सदर मालमत्ता धोकादायक असल्याने १८ एप्रिल २०२३ मध्ये पालिका प्रशासनाने मालमत्तेचे स्ट्रक्चरल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती प्रभाग समिती क्रमांक २ चे सहाय्यक आयुक्त सुधीर गुरव यांनी दिली आहे.