गुडघेदुखीवरील औषधी प्यायल्याने तीन वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 11:14 PM2021-02-12T23:14:54+5:302021-02-12T23:15:44+5:30
गुडघेदुखीवरील औषधी तेल ज्यूस समजून प्यायल्याने तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बदलापुरात घडली.
बदलापूर : गुडघेदुखीवरील औषधी तेल ज्यूस समजून प्यायल्याने तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बदलापुरात घडली. अद्विक चव्हाण असे या दुर्देवी मुलाचे नाव असून तो कुटुंबियांसह काकाच्या घरी आला होता. त्यावेळी हा प्रकार घडला. उपचारासाठी त्याला डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
डोंबिवली पूर्वेला राहणारे मोहनसिंग चव्हाण (३३) त्यांच्या पत्नी व मुलगा अद्विकसह बदलापूर येथील सानेवाडीत राहणाऱ्या भावाच्या घरी आले होते. यावेळी मोहनसिंग यांच्या आईने गुडघेदुखी
कमी करण्यासाठी घरगुती पद्धतीने भीमसेन कापूर, पुदिना फुल, अज्वाईन फुल यांच्या मिश्रणातून बनवलेले तेल खिडकीत ज्यूसच्या बाटलीत ठेवले होते. या बाटलीत ज्यूस असल्याचे समजून अद्विकने ते मिश्रण संपवले. त्यामुळे चक्कर आलेल्या अद्विक याला सुरवातीला बदलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावत असल्याने त्याला तातडीने डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणीच उचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.