लॉटरी काढून तीन वर्षे उलटूनही बाळकूममधील २५० घरांचा ताबा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:39+5:302021-07-10T04:27:39+5:30
ठाणे : म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी फुटून तीन वर्षे उलटली तरी बाळकूम प्रकल्पातील लाभार्थी ठरलेल्या २५० ग्राहकांना ...
ठाणे : म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी फुटून तीन वर्षे उलटली तरी बाळकूम प्रकल्पातील लाभार्थी ठरलेल्या २५० ग्राहकांना घराचा ताबा अद्याप मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या लॉटरीमधील घरे ही २०१८ मध्ये बांधून तयार झालेली होती. मात्र, या प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे कारण पुढे करून म्हाडाने ताबा देण्याची प्रक्रिया थांबविली आहे. त्यामुळे विजेत्या भाग्यवंतांच्या आनंदात विरजण पडले आहे, तर महापालिकेने जलवाहिनीचे काम अपूर्ण ठेेेवल्यानेच ताबा दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या गोंधळात या घरांचे खंडरमध्ये रूपांतर होऊ लागले आहे.
म्हाडाच्या ठाणे मंडळाने २०१८ मध्ये सुमारे चार हजार घरांची सोडत काढली होती. या सोडतीमध्ये बाळकूम येथील योजना क्रमांक दोन २७६ मधील सुमारे २५० घरांचा समावेश होता. यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते. सोडत काढल्यानंतर विजेत्या अर्जदारांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान एक शिबिर घेतले. त्यामध्ये बहुतेक ठिकाणच्या विजेत्या अर्जदारांना इरादा पत्राचे वाटप केले असले तरी बाळकुममधील विजेत्या अर्जदारांना फक्त पात्रता सिद्ध झाल्याचे पत्र दिले. तुम्हाला दोन ते तीन महिन्यांत ताबा देण्यात येईल, असे सांगिले होते. मात्र, पात्रता सिद्ध होऊन आता अडीच वर्षे उलटून लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळू शकलेला नाही.
इमारती खंडर होण्याची भीती
बाळकूममध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी उभा केलेला हा प्रकल्प म्हाडाचा स्वत:चा आहे. येथील घराची किंमत सुमारे ४५ लाख रुपयांच्या आसपास आहे. २०१८ ची सोडत निघण्यापूर्वीच या इमारतीचे काम पूर्ण झालेले होते. इमारत पूर्ण होऊनही तिचा निवासी वापर सुरू झालेला नाही. त्यामुळे या इमारती खंडर बनतात की काय, अशी चिंता विजेत्या अर्जदारांना लागली आहे.
.....
महापालिकेकडून पाण्याची जलवाहिनी टाकण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे, यासंदर्भात आता चर्चा केली आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात बैठक लावली आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लाभार्थ्यांना चाव्या दिल्या जातील.
(जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माणमंत्री, महाराष्ट्र राज्य)
.....................