विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Published: May 3, 2024 01:35 AM2024-05-03T01:35:02+5:302024-05-03T01:35:25+5:30
ठाण्याच्या ढाेकाळी भागात राहणाऱ्या रिक्षाचालक आराेपी दिलीप याने १८ ऑगस्ट २०२० राेजी सकाळी १० वाजेच्या सुमारास १५ वर्षांची पीडित मुलगी घरी असताना तिच्या घरात जबरदस्तीने शिरकाव केला.
ठाणे : चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दिलीप राधे कृष्ण सोनी (३०) या आराेपीला ठाणे न्यायालयाने तीन वर्षे आठ महिने कारावासाची, तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाेठावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही आराेपीला भाेगावी लागणार आहे.
ठाण्याच्या ढाेकाळी भागात राहणाऱ्या रिक्षाचालक आराेपी दिलीप याने १८ ऑगस्ट २०२० राेजी सकाळी १० वाजेच्या सुमारास १५ वर्षांची पीडित मुलगी घरी असताना तिच्या घरात जबरदस्तीने शिरकाव केला. त्यानंतर तिला चाकूचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला. मला जे काही करायचे ते करू दे, नाही तर तुला मारून टाकीन, अशी धमकीही त्याने तिला दिली हाेती. याप्रकरणी कापूरबावडी पाेलिस ठाण्यात विनयभंगासह पाेक्साे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पाेलिसांनी त्याला अटक केली हाेती. याच खटल्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष पाेक्साे न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात २ मे राेजी सुनावणी झाली. आराेपीला शिक्षा हाेण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता संध्या म्हात्रे यांनी जाेरदार बाजू मांडली. यामध्ये सहा साक्षीदार तपासले. पाेलिस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी तपास अधिकारी म्हणून तर हवालदार ईश्वर मनोरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.